
सध्याचे युग डिजिटलचे आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होत आहे. जग खऱ्या अर्थाने खेडे ठरले आहे. या युगाचे जितके फायदे आहेत. त्यापेक्षा अधिक तोटे सहन करावे लागत आहेत. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. येत्या 5 ते 6 वर्षांत एआय या नोकऱ्या खाऊन टाकण्याची भीती आहे. कोणती आहेत ही क्षेत्रं? तुम्ही जर त्यात काम करत असाल तर हे भाकीत समजून घ्या आणि पुढील नियोजन नक्की करा.
मोठ्या मोठ्या टेक कंपन्या टीसीएस, इंटेल, टेस्ला, गुगल, मेटा आणि इतर कंपन्यांनी एक लाखांहून अधिक लोकांना घरचा रस्ता दाखवला आहे. काही पदाचे काम एआय करत आहे. त्यामुळे जगातील काही क्षेत्रात मनुष्याची आणि त्याच्या श्रमाची किंमत अगदी शुन्य होणार आहे. या क्षेत्रात एआयच्या मदतीने काम होणार आहे. या क्षेत्रात नोकरी करण्याची गरजच उरणार नाही. हे जॉब कायमचे बंद होण्याची भीती आहे.
या क्षेत्राला बसू शकतो सर्वात मोठा फटका
याविषयीच्या एका अहवालानुसार, येत्या 5 वर्षांत जगात अनेक गोष्टी झपाट्याने बदलतील. एआयमुळे जॉब मार्केट जवळपास 22 टक्क्यांनी बदलेल. जगभरात थोड्या थोडक्या नाही तर 9.2 कोटी नोकऱ्या जातील. येथील कर्मचाऱ्यांना सहानुभुतीवर काही दिवस नोकरी करु दिले जाईल. पण त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात येणार नाही. तर काही नोकऱ्या ताबडतोब बंद होतील. तिथल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या खात्यात पाठवण्यात येईल अथवा घरचा रस्ता दाखवला जाईल.
यामध्ये पोस्टल सर्व्हिस क्लर्क, डाटा एंट्री ऑपरेटर्स, बँक टेलर्स आणि क्लर्क, रोखपाल, तिकीट क्लर्क, प्रिटिंग आणि संबंधित कामगार, अकाऊंटिंग, बुककिपिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, स्टॉक किपिंग, मटेरिअल रेकॉर्डिंग क्लर्क, डोअर टु डोअर सेल्स वर्कर्स, कंडक्टर, न्यूज वेंडर, दळणवळणातील काही नोकऱ्या यासह इतरही काही नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते.
तर दुसऱ्या बाजुला एआयमुळे काही कौशल्य आत्मसात करणाऱ्या लोकांना नोकरी सुद्धा मिळाली आहे. काही नवीन नोकऱ्या समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात नोकऱ्यांचे जग संपूर्णपणे बदललेले असेल. तेव्हा या बदलाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्यात बदल करावा लागणार आहे. नवीन कौशल्य शिकावं लागणार आहे.