अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 1 टन गोमांस जप्त; नाशिकमध्ये 9 गायींसह 2 बैलांची सुटका

| Updated on: Oct 23, 2021 | 3:03 PM

नाशिकमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून एक टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 1 टन गोमांस जप्त; नाशिकमध्ये 9 गायींसह 2 बैलांची सुटका
नाशिक पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून गायी आणि बैलांची सुटका केली.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून एक टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकमधील संजीवनगर भागातील एकविरा शाळेच्या पाठीमागे अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे आढळून आले. या छाप्यात पोलिसांना एक ओमनी गाडी जप्त केली. या गाडीत मांस ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक टन गोमांस जप्त केले आहे. तसेच येथील नऊ गायी आणि दोन बैल आणि एका वासराची सुटका करण्यात आली. येथे एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार, बीट मार्शल तुषार देसले, गुन्हे शाखेचे चंद्रकांत गवळी, प्रमोद काशिद, संदीप लहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंजुम कुरेशी (रा. बागवानपुरा), जमील खान (रा. संजीवनीनगर), फरान कुरेशी (रा. चौक मंडई), समीर खान (रा. संजीवनीनगर), सद्दाम खान (रा. संजीवनीनगर), आरीफ खान (रा. संजीवनीनगर), सुलतान कुरेशी (रा. भारतनगर), समीर कुरेशी (रा. भारतनगर, वडाळा), इरफान कुरेशी (रा. चौक मंडई), ख्वाजा कुरेशी (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळावरून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

खुनी अखेर ताब्यात

नाशिकच्या दूध बाजारात भररस्त्यात खून करणाऱ्या संशयित आरोपी आकाश आडेला भद्रकाली पोलिसांनी नांदेडमध्ये जावून बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात दोघात किरकोळ कारणातून वाद झाला आणि एकाने त्याच्याजवळील धारदार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. नितीन उर्फ सोनू गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपी आकाश आडे याला नांदेडमध्ये जावून बेड्या ठोकल्या आहेत. एपीआय मोहिते आणि युवराज पाटील यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

इतर बातम्याः

साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच; संमेलन स्थळ नाशिक बाहेर नेल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी

शिवसेना आमदार कांदे अन् अक्षय निकाळजे यांची पोलीस आयुक्त करणार चौकशी