
नाशिकमध्ये किरकोळ वादातून एका सोळा वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. या हत्येमागील कारण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या अशोक नगर येथील एका खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बेंचवर बसण्यावरून दोन मुलांसोबत बुधवारी वाद झाला होता.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यशराज गांगुर्डे या अल्पवयीन मुलाला दोघांनी बेदम मारहाण केली. यात यशराजला जबर मार लागल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला काही नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या यशराज गांगुर्डे या मुलाच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वीच दुःखत निधन झाले होते. या दुःखातून गांगुर्डे कुटुंब जेमतेम सावरले असतानाच त्यात यशराज याची हत्या झाल्याने गांगुर्डे कुटुंबीय आणखीन दुःखात गेले आहे. यशराज गांगुर्डे यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या मोठ्या भावाच्या खांद्यावर आहे. त्याचा भाऊ गिरणीत काम करत कुटुंबाचा प्रपंच चालवत होता. यशराज याच्या शिक्षणावर लक्ष देत त्याला खाजगी क्लास लावून दिला होता, मात्र याच खाजगी क्लास मध्ये झालेल्या वादातून यशराजची हत्या झाली आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारीत वाढ होत आहे, त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न देखील या घटनेमुळे अधोरेखित झाला आहे. अनेक वेळा शाळा कॉलेज परिसरात वैयक्तिक आणि किरकोळ कारणातून अनेक मुलांच्या हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. बाल गुन्हेगारी वाढली असल्यामुळे या अल्पवयीन मुलांचे शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासेसमध्ये समुपदेशन होणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे.