दाढी, मिशा वाढवून, वेषांतर करून 6 महिने भटकला… मुंबईच्या चोरट्याच्या पोलिसांनी नॉएडात कशा मुसक्या आवळल्या ?

मुंबईतील एक सराईत चोर 6 महिने वेषांतर करून पोलिसांना चकमा देत फरार झाला. दाढी-मिशा वाढवून आणि वेषांतर करून तो नोएडापर्यंत पोहोचला होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्रंदिवस केलेल्या तपासानंतर त्याला नोएडा येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या चोरीच्या प्रकरणात आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दाढी, मिशा वाढवून, वेषांतर करून 6 महिने भटकला... मुंबईच्या चोरट्याच्या पोलिसांनी नॉएडात कशा मुसक्या आवळल्या ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 18, 2025 | 7:30 AM

कानून के हाथ बहोत लंबे होते है, गुन्हेगार कितीही सराईत असला तरी तो कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात सापडतोच. अशी अनेक वक्तव्य आपण ऐकली असतील पण हे खरंच घडलं असेल तर ? गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार दाढी-मिशा वाढवून, वेषांतर करून फिरणारा, स्वत:ला अगदी सराईत आणि हुशार चोरटा समजणारा एक आरोपी अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. वेषांतर करून, दाढी वगैरे वाढवून, डोक्याला मफलर बांधून, रिक्षा चालवत पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सराईत चोराला दिल्लीजवळील नॉएडा येथून बेड्या ठोकण्यात अखेर नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तो पोलिसांना हुलाकवणी देत होता. मुंबईत चोरी केल्यानंतर तो थेट नॉएडाला पळून गेला होता, आता आपण कधीच पोलिसांना सापडणार नाही, असा विश्वास वाटत होता, पण मुंबई पोलिसांनी रात्रंदिवस तपास करून अखेर त्याला बेड्या ठोकल्याच.

काय आहे प्रकरण ?

अत्यंत सराईत असलेल्या या चोराने त्याच्या साथीदारासह नालासोपारा पश्चिम येथील नाला पढई येथील राहणारे दीपेश म्हात्रे यांच्या घरात 8 जुलै 2024 रोजी घरफोडी केली होती. आणि 25 लाख 66 हजार 518 रुपये किमतीचे 620 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ते दोघे फरार झाले. याप्रकरणी म्हात्रे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता चोरी करणारे आरोपी हे रिक्षाने आल्याचे त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. सुमारे 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, रिक्षाच्या नंबर प्लेटच्या आधारे शोध घेतला असता, ही रिक्षा भिवंडीच्या काल्हेर गावात सापडली. अखेर पोलिसांनी रिक्षाचालक योगेश गोविंद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, साथीदार रिझवान अन्सारी, आणि मोझम शेख यांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने कबूल केले.

मुंबईतून थेट नॉएडात पळाला

यातील रिझवान आणि मोझम दिल्लीला दागिने विक्रीसाठी गेल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दिल्ली येथे तांत्रिक तपास करून मोझमला अटक केली, परंतु रिझवान सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी हार न मानता त्याचा शोध सुरू ठेवला आणि अखेर 3 जानेवारी रोजी दिल्लीजवळच्या नॉएडामध्ये रिक्षा चालवताना त्याला अटक केली. त्याच्याकडून 11 लाख 25 हजार रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. हे आरोपी सराईत असून, जेल मध्ये असतानाच आरोपनी गुन्ह्याचा कट रचला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.