सांगलीतील नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, दोघांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Mar 18, 2023 | 5:51 PM

सांगलीतील जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली. या हत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विजय ताड यांचे भाऊ विक्रम ताड यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सांगलीतील नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, दोघांविरोधात गुन्हा दाखल
भाजप नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली / शंकर देवकुळे : जत मधल्या भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नगरसेवकाचे भाऊ विक्रम ताड यांनी संशयित म्हणून संदीप उर्फ बबलू चव्हाण नामक व्यक्तीसह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. संशयित संदीप उर्फ बबलू चव्हाण आणि साथीदाराने आपल्या भावावर गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप विक्रम ताड यांनी केला आहे. बबलू चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. फिर्यादीत जत भाजपाचे नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. उमेश सावंत आणि विजय ताड यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. यामुळे ही हत्या राजकीय संघर्षातून झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष

विजय ताड यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी उमेश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता, हे समोर आले आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जत पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येतोय आणि त्यांच्या अटकेनंतरच या हत्याच्या कारणाचा उलगडा होणार आहे. तपासाअंती सत्य उघड होईल.

विजय ताड यांची शुक्रवारी झाली होती हत्या

सांगलीच्या जत नगरपालिकेचे भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांची शुक्रवारी गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. मुलांना शाळेत आणण्यासाठी आले असताना विजय ताड यांची हत्या करण्यात आली. या घटनेने जतसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा