Asim Munir : ऑपरेशन सिंदूरवर आसिम मुनीरने पुन्हा आळवला नवा राग, आता म्हणाले..
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा झालेला दारुण पराभव लपविण्यासाठी असीम मुनीर यांनी आता नवा राग आळवत धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे. असं काय म्हणाले ते ?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) सतत विधाने करताना दिसतात. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मे महिन्यात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची (Pakistan) पळता भुई थोडी झाली. त्यांचा दारूण पराभव झाला, मात्र आसिम मुनीर सातत्याने हे फेटाळून लावतात. या पराभवानंतर, मुनीर यांनी आता आपल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी एका नवीन राग आळवला आहे. आपलं धोरणात्मक अपयश लपविण्यासाठी असीम मुनीरने आता देवाची मदत घेतली आहे. रावळपिंडी मुख्यालयातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक विधान केले ज्याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, असीम मुनीर यांनी अंधश्रद्धा आणि दैवी हस्तक्षेपाचा (Divine Intervention) आधार घेतला. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा भारतीय सैन्याचा दबाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा पाकिस्तानी सैन्याला दैवी मदतीमुळे वाचवण्यात आले. “देवाची मदत आली, आणि आम्ही ती येताना पाहिली, आम्हाला ती जाणवली” असं ते म्हणाले.
मुनीर यांचा नवा राग
मिळालेल्या माहितीनुसार, असीम मुनीरचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा 10 डिसेंबरचा असल्याचे पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे. मे महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांचा उल्लेख केला. एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 22 जण मारले गेले. त्यानंतर भारातने 7 मे रोजी पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लाँच केलं. दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला, नंतर 10 मे रोजी दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम झाला.
देवाची मदत येताना पाहिलं
ऑपरेशन सिंदूर झालं त्या दिवसांचा उल्लेख करताना जनरल मुनीर म्हणाले, मे महिन्यात जेव्हा शत्रू (भारत) आपल्या सर्व संसाधनांसह आणि तंत्रज्ञानासह आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा जगाच्या तर्कशास्त्राने काम (Worldly Logic) करणे थांबवले होते. त्यावेळी हालत अशी होती ती टिकून राहणं कठीण होतं. पण, मी आज हे ऑन-रेकॉर्ड सांगतो की – आम्ही अल्लाहची मदत येताना पाहिली. त्या मदतीची आम्हाला जाणीव झाली. तो एक दैवी हस्तक्षेप (Divine Intervention) होता, ज्यामुळे आमच्या सैनिकांचा निर्धार, हिंमत कायम राहिली आणि शत्रूंचे मनसुबे उधळून लावले. हा विजय शस्त्रांपेक्षा श्रद्धेच्या बळावर होता, कारण शत्रू तांत्रिकदृष्ट्या खूप पुढे होता असं म्हणत असीम मुनीर यांनी धोरणात्मक अपयश लपवण्याचा प्रयत्न केला.
तुम्हाला कोणी हरवू शकत नाही
यावेळी त्यांनी कुराणातील एका आयतचा हवाला दिला – जर देवाने तुमची मदत केली, तर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही – आणि संघर्षादरम्यान पाकिस्तानला अल्लाहची मदत मिळाली, असे संकेत त्याने दिले.
ऑपरेशन सिंदूर
एप्रिल महिन्यात पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून ठार मारलं, त्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत मे महिन्याच्या सुरूवातीला ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. या कारवाईदरम्यान, भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला, ज्यात शेकडो दहशतवादी मारले गेल. त्यानंतर, दोन्ही देशांमधील तणाव वाढला आणि 10 मे रोजी युद्धबंदी झाली.
