विजवाडा : आंध्र प्रदेशच्या विजयवाडा परिसरात थर्मल पॉवर स्टेशनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्टची केबल तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यामध्ये तीन जणांना प्राण गमवावा लागला. लिफ्टमध्ये एकूण आठ लोक होते. त्यातील उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले गेले. लिफ्ट खूप उंचीवरून खाली पडल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या लिफ्ट देखभालीच्या कामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप असून, त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने थर्मल पॉवर स्टेशनमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.