वीज थकबाकी वसूल करायची की नाही? कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने संताप, पोलिस गुन्हा दाखल, नाशकात काय घडलं ?

वीज थकबाकी वसूल करायला गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने महावितरणचे कर्मचारी संताप व्यक्त करत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वीज थकबाकी वसूल करायची की नाही? कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने संताप, पोलिस गुन्हा दाखल, नाशकात काय घडलं ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 16, 2023 | 9:58 AM

नाशिक : नाशिक शहरात सध्या वीज थकबाकी वसूली मोहीम महावितरणच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी एक पथकही तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या नाशिक शहरातील भारत नगर येथे थकबाकी वसूली सुरू असतांना अचानक एका ग्राहकाने पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर हल्ला झाला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे. दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यावरून महावितरण विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे.

मार्च अखेरीस सर्व थकीत वीजबिल वसूलीची मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये ज्यांनी वीजबिल थकविले आहे. त्या ग्राहकांकडून वीज बिल वसूली केली जात आहे. त्यासाठी महावितरण कडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वसुलीचे पथकच सध्या थकीत ग्राहकांकडे जावून वीज बिल वसूल करीत आहे. जे ग्राहक थकीत वीजबिलाचा भरणा करत नाही त्या ग्राहकांना महावितरण कडून विनंती केली जात आहे. ज्यांना विनंती करून झालीय त्यांचे थेट कनेक्शन बंद करण्याच्या कारवाईचा इशारा दिला जात आहे.

अशीच कारवाई सध्या नाशिक शहरातही सुरू आहे. महावितरणचे वसूली पथक थकबाकीदर ग्राहकांच्या घरी जाऊन वसूली करीत आहे. त्यातील एका संतापलेल्या ग्राहकाने थेट महावितरणच्या वसूली पथकावर हल्ला चढविला आहे.

नाशिकच्या भारत नगर येथे हा हल्ला झाला असून यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यासह पथकावर हल्ला झाला आहे. याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून संताप व्यक्त केला जात आहे. थकीत विज बिल संदर्भात वसुलीसाठी गेले असताना ही घडली घटना आहे.

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी महावितरणचे कर्मचारी आक्रमक झाले असून निषेध व्यक्त करत आहे.