‘त्या’ अपहृत मुलाची अखेर सुटका, पोलिसांनी 24 तासाच्या आत बालकाचा घेतला शोध

| Updated on: Jun 03, 2023 | 4:24 PM

रात्री दूध पिऊन आईच्या कुशीत चिमुकला झोपला होता. सकाळी उठून पाहिले असता बालक गायब होता. पण पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहिम घेत प्रकरणाचा छडा लावला.

त्या अपहृत मुलाची अखेर सुटका, पोलिसांनी 24 तासाच्या आत बालकाचा घेतला शोध
नागपुरातून अपहरण झालेल्या बालकाची सुटका
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : आईच्या कुशीतून पहाटेच्या सुमारास गायब झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. चिमुकल्यासाठी नागपूर पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली. दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 200 पोलीस रस्त्यावर उतरून चिमुकल्याचा शोध घेतला. अखेर संध्याकाळच्या सुमारास चिमुकला नागपूरच्या जरीपटका परिसरामध्ये एका महिलेकडे आढळला आणि पोलिसांनी सुटकेचा विश्वास सोडला. एका महिलेच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यात आली आहे. सदर महिलेला पोलसिांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

रात्री आईच्या कुशीत झोपलेला चिमुकला सकाळी गायब होता

रिहाना परवीन नावाची महिला गुरुवारी रात्री आपल्या चार मुलांना घेऊन नागपुरात आली. मोमीनपुरा परिसरातील मशिदीजवळ फुटपाथवरच ती झोपली होती. पहाटेच्या समारस तिला जाग आली असता तिच्या कुशीत झोपलेला तीन ते चार महिन्यांचा चिमुकला गायब होता. तिने परिसरात शोधाशोध केली, मात्र तो न आढळल्याने अखेर तहसील पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाची दखल घेत शोध मोहीम राबवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ट्राफिक पोलिसांपर्यंत सर्वांना माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या मदतीने बालकाची सुटका

एका पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांकडून मुलाचा फोटो शेअर करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेकडे चिमुकला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेत पाहिले असता शबनम नावाच्या महिलेकडे मूल आढळले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि मुलाला आईच्या स्वाधीन केले. संबंधित महिला अतिशय घाबरलेली होती आणि ती बोलण्याच्या स्थितीत देखील नव्हती. त्यामुळे बाळ तिच्यापर्यंत कसं गेलं हे शनिवारी पोलीस चौकशी स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा