बाथरूमच्या लादीखालीच नवऱ्याला गाडलं, 45 दिवस… सियापेक्षाही भयंकर कृत्य; बाथरूम मर्डरने देश हादरला

उत्तर प्रदेशातील आग्र्यात एका भयानक हत्याकांडात पत्नीनेच पतीची हत्या करून मृतदेह बाथरूमच्या फरशीखाली गाडला. तब्बल ४५ दिवस बेपत्ता असलेल्या पतीचे रहस्य उघडकीस आले आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बाथरूमच्या लादीखालीच नवऱ्याला गाडलं, 45 दिवस... सियापेक्षाही भयंकर कृत्य; बाथरूम मर्डरने देश हादरला
Agra bathroom murder
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 03, 2026 | 11:46 PM

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. सिया गोयलने केलेल्या मर्डरपेक्षाही हे हत्याकांड अत्यंत भयानक असल्याचं समोर आलं आहे. या हत्याकांडाने पोलीसच नव्हे, स्थानिक लोकही हादरून गेले आहे. तब्बल 45 दिवस बेपत्ता असलेला नवरा अखेर घरातील बाथरूममध्ये फरशी खाली गाडलेला सापडला. या प्रकरणाची मास्टर माइंड त्याची बायकोच निघाली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची उलट तपासणी सुरू आहे.

आग्र्यातील सिंकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्राची टॉवर चौकी परिसरातील रेणुका धाम कॉलोनीतील ही धक्कादायक घटना आहे. सुरेंद्र कुमार शर्मा हा 44 वर्षाचा इसम 18 मेपासून बेपत्ता होता. त्याला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक दिवस रात्र एक करत होते. यावेळी त्याची पत्नी रुबी एकच सांगत होती. माझा नवरा कुठे तरी गेलाय. तो परत येईल, असं ती वारंवार सांगत होती. त्यानंतर तिने 26 मे रोजी नवरा हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल केली.

मेळच लागेना…

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना अनेक गोष्टींचा मेळ लागत नव्हता. त्यामुळे त्यांचा संशय वाढला. शुक्रवारी पोलीस पुन्हा एकदा सुरेंद्रच्या घरी आले. यावेळी रुबीचं वागणं पोलिसांच्या नजरेतून चुकलं नाही. काही तरी गडबड असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. याचवेळी सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मानेही पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी सुरेंद्रच्या घराचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

लादीकडे नजर गेली…

तपास करत असताना पोलिसांची नजर बाथरूममधील लादीकडे गेली. बाथरूममध्ये ताजं प्लास्टर केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम सुरू केलं. बाथरूम खोदल्यावर लादीच्या खाली सुरेंद्रची डेडबॉडी सापडली. सुरेंद्र डेडबॉडी सापडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली.

प्लास्टर केलं…

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, सुरेंद्रची हत्या केल्यानंतर त्याला बाथरूममध्ये दफन करण्यात आलं. त्यानंतर वरून माती टाकून प्लास्टर करण्यात आलं. कुणालाही संशय येऊ नये म्हणून हे करण्यात आलं. आता सुरेंद्रची हत्या करण्यात केवळ रुबीचा हात आहे की त्यात अजून कोणी सहभागी आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत.

रूबीची कबुली

पोलिसांनी या घटनेनंतर रुबीला अटक केली. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला आहे. हत्येच्या आधीच बाथरूमचं काम करण्यासाठी मिस्त्री आणि मजदूर बोलावण्यात आले होते, असं रुबीने पोलिसांना सांगितलंय. मात्र याचा आम्हाला खोलात तपास करायचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दारूचं व्यसन

सुरेंद्रला दारूची लत होती. त्यामुळे दोघा पती पत्नीत वारंवार भांडणं व्हायची. सुरेंद्र गायब झाल्यानंतर रुबीनेच फोन करून आम्हाला बोलावून घेतलं. त्यानंतर तो गायब झाल्याची तक्रार केली गेली. आमचं सर्व कुटुंब सुरेंद्रचा शोध घेत होतं. पण काहीच सुगावा लागला नाही, असं सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्माने सांगितलं.

Follow Us