
संध्याकाळी 7 च्या आसपासची वेळ, थंडीच्या दिवसांमुळे लवकर पडलेला अंधार, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात वाहनांची ये-जा सुरू होती. दिवसभराचं काम संपवून, थकून भागून तरीही घराच्या , कुटुंबियांच्या ओढीने सगळेच आपापल्या गाड्यांवरून घराच्या दिशेने निघाले होते. पुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूने नियमित वाहतूक सुरू होती, अनेक दुचाकींची वेगाने ये-जा सुरू होती, तर त्याच मुलाच्या डाव्या बाजूला खाली जाणाऱ्या एका उतारावरून अनेक नागरिक पायी चालत जात होते. सगळे आपापल्या विचारात मग्न, कोणी फोनर बोलत होतं तर कोणी अजून काही विचार करत चालत होते. तेवढ्यातच टायर्स घासले गेल्याचा, धाडकन टक्कर झाल्याचा आवाज आला आणि नागरिकांच्या कानठळ्या बसल्या.
डाव्या बाजूने जाणारी एक कार अचानक लेन तोडून उजव्या बाजूला घुसली आणि समोरून येणाऱ्या दुचाकींना अगदी खेळणातल्या गाड्यांसारखं उडवत, त्यावरून लोकांना चिरडत, भीषण आवाज करत कशीबशी थांबली. कारच्या पुढे आलेला एक दुचाकीस्वार, त्याच्यानंतर मागेच असलेल्या दोन बाईक्सवरचे दोन चालक हे अगदी एखाद्या बाहुलीसारखे चिरडले गेले, एकतर कारच्या धडकेने थेट उडाला आणि पुलाच्या साईडला असलेल्या कठड्यावरून थेट खाली फेकला गेला.
हादरवणारं, वाचतानाही अंगावर काटा येणारं हे वर्णन एखाद्या पुस्तकातलं नाही किंवा तो एखाद्या चित्रपटाचा सीनही नाही. दुर्दैवाने हे अगदी खरंखुरं घडलं, तेही जिवंत माणसांसोबंत, त्या अपघातामुळे क्षणात चार जिवंत माणसं फक्त कलेवरं बनली. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमधील पुलावर घडलेल्या अपघाताची कालपासून चर्चा आहे. त्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या, मात्र त्या अतिशय भीषण, हृदयद्रावक, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या संपूर्ण अपघाताचा आणि त्यानंतर उठलेल्या कल्लोळाचा सगळा तपशील त्या पुलजावळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
नागरिकांचा श्वास रोखला, अपघातानंतर एकच पळापळ
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या मालकीची असलेली गाडी त्यांचे चालक लक्ष्मण शिंदे चालवत होते. 25 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असलेले शिंदे हे गेल्या पाच वर्षांपासून चौबे यांच्यासाठी काम करत होते. शुक्रवारी संध्याकाळी शिंदे नेहमीप्रमाणे कार चालवत होते तर चौबे त्याच कारमध्ये बसले होते. पुर्वेकडून पश्चिमेकड जाणाऱ्या पुलावर साधारण पावणेसातच्या सुमारास ( 6 वाजून 42 मिनिटे) त्यांची कार आली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं. दोन दशकांहून अधिक काळ कार चालवण्याचा अनुभव असलेल्या शिंदे यांना कार चालवत असतानाच अचानक अटॅक आला आणि कारवरील नियंत्रण सुटलं.
उजवीकडून जाणारी कार अचानक डाव्या लेनमध्ये घुसली आणि समोर दिसेल त्याला चिरडत गेली. या अपघातात कारचालक शिंदे यांच्यासह तीन दुचाकीस्वारांचाही मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून सगळेच हादरले, इतर नागरिकांनी लगेच धाव घेत कारमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भीषण धडकेमुळे कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता तर तिन्ही दुचाकींचं अतोनात नुकसान झालं, की त्या ओळखण्यापलीकडे गेल्या होत्या. कारच्या समोरच आलेला, पहिली धडक बसलेला दुचाकीस्वार बोनेटवर आपटून, छतावर धडकून पुलाखाली फेकला गेला. तर मागून येणार दोघेही कारखाली चिरडले गेले. या अपघातात शिवसेना शिंदे गटाचे किरण चौबेही जखमी झाले.
पुलावर उपस्थित इतर लोकांनी त्यांना मदत करत कसंबसं बाहेर काढलं. त्यांच्यासह इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. बघता बघता अपघातस्थळी प्रचंड गर्दी झाली, वाहतूक कोंडीही झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गावी गेलेली पत्नी परत आली, संध्याकाळी भेटतो सांगून निघालेल्या शिंदेंच्या मृत्य़ूची बातमीच घरी आली
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारने अपघात झाला त्याचे चालक लक्ष्मण शिंदे यांना 25 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव होते. गेल्या 5 वर्षांपासून ते शिवसेना शिंदे गटाचे किरण चोबे यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ते औषधे नियमित घ्यायचे, म्हणून त्यांना अन्य कोणताही त्रास नव्हता अशी माहिती कुटुबियांनी दिली. शिंदे यांना तीन मुली असून ते पत्नी व मुलीसह अंबरनाथमध्येच रहायचे.
एक आठवड्यापूर्वी त्याची पत्नी मुलींना घेऊन गुजरातला उपचारांसाठी गेली होती. कालच त्यांची पत्नी गुजरात वरून अंबरनाथला परतली होती . शिंदे हे नियमितपणे सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत काम करत होते. काल ते कामावरती गेल्यानंतर पत्नी परतली होती, तेव्हा काम संपवून येतो असे शिंदे यांनी फोनवरून सांगितले. मात्र प्रत्यक्षात भेट होण्यापूर्वीच, घरी परतण्याच्या आधीच त्यांच्यावर काळाने घात केला . लक्ष्मण शिंदे यांच्या मृत्यूनंतर कुटुंब उघड्यावर आले असून तीन मुलींसह घरातील जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही शोकाकुल नातेवाईकांच्या डोळ्यांत दिसत आहे.