स्कूल व्हॅनमधून उतरली आणि घराच्या दिशेने निघाली, पण घरी पोहचलीच नाही चिमुकली !

गाडी रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधील जेलरोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

स्कूल व्हॅनमधून उतरली आणि घराच्या दिशेने निघाली, पण घरी पोहचलीच नाही चिमुकली !
स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 04, 2023 | 10:12 PM

नाशिक / चंदन पुजाधिकारी : स्कूल व्हॅनचे चाक अंगावर गेल्याने 8 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिक येथे घडली आहे. जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे ही घटना घडली आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे मयत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्कूल व्हॅन चालक गाडी रिव्हर्स घेत असताना ही घटना घडली. जखमी अवस्थेत अपेक्षाला जयराम हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र डॉ. सुनील मोकासरे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गाडीच्या मागच्या टायरखाली आल्याने मृत्यू

जेलरोडवरील पवारवाडी येथे राहणारी अपेक्षा ही नवीन मराठी शाळेत शिकत होती. दुपारी नेहमीप्रमाणे ती शाळेतून घरी आली. अपेक्षा नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅनने घरी आली. व्हॅनमधून उतरल्यानंतर ती व्हॅनच्या मागच्या बाजूने घरी जात होती. तेवढ्यात व्हॅन चालकाने गाडी रिव्हर्स घेतली. गाडी रिव्हर्स घेतल्यानंतर गाडीचा मागच्या टायरखाली चिमुकली आल्याने गंभीर दुखापत झाली.

चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.