Nashik| मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एका कैद्याची आत्महत्या; झाडाला चादर बांधून घेतला गळफास

| Updated on: Nov 22, 2021 | 10:43 AM

गेल्यावर्षी एका कैद्याने मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास घेतला होता. या कैद्याच्या आत्महत्येचेही कारण समजू शकले नव्हते.

Nashik| मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एका कैद्याची आत्महत्या; झाडाला चादर बांधून घेतला गळफास
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नाशिकः नाशिक मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुलतान तडवी असे त्या 40 वर्षीय कैद्याचे नाव आहे. त्याने कारागृह परिसरात असलेल्या एका झाडाला चादर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हे उघडकीस आले तेव्हा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची धावाधाव

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याने आत्महत्या करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. सुलतान तडवी या कैद्याने आत्महत्या केल्याने पुन्हा या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. तडवीच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस येताच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी धावाधाव करत तो जिवंत आहे का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्पळ ठरले. एका चादरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेत स्वतःला संपवले.

एप्रिलमध्येही प्रयत्न

यापूर्वी एप्रिल महिन्यामध्येही एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सॅनिटायझर पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. संचित रजा नामंजूर केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र, कारागृह प्रशासनाला हा प्रकार वेळीच समजल्याने त्याचे प्राण बचावले. अविनाश जाधव असे त्या कैद्याचे नाव होते. विशेष म्हणजे त्याने एक सुसाईड नोट तयार केली होती. त्यात कारागृहातील पोलीस अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तडवीच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गेल्यावर्षीही घटना

गेल्यावर्षी एका कैद्याने मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास घेतला होता. या कैद्याच्या आत्महत्येचेही कारण समजू शकले नव्हते. अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी, असे त्या आत्महत्या करणाऱ्या मृत कैद्याचे होते. अजगर मन्सुरी कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, त्याने कैद्यांच्या बराकीत मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच कारागृह रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि त्याला मृत घोषीत केले. मात्र, ही आत्महत्या कशाने झाली होती, हे काही समजले नाही.

पोलिसांचे वर्तन कारणीभूत?

पोलीस अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून कैद्याने आत्महत्या केल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. या आत्महत्यांमध्येही तोच प्रकार आहे का, याची चर्चा आता रंगली आहे. या आत्महत्या प्रकरणांची चौकशी झाली, तरच हे समोर येऊ शकेल. मात्र, काहीही असो कैद्यांच्या आत्महत्येचे प्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी पोलिसांनीही आपले वर्तन थोडेफार सुधारले, तर बराच फरक पडू शकतो.

इतर बातम्याः

आरोग्य भरतीमध्ये फेरपरीक्षा, चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 572 उमेदवारांची यादी जाहीर

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!