
साधारण दीड वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या केसमध्ये शाळेतील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचेही समोर आले, नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली. पोलिस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. मुंबईपासून अवघ्या काही अतंरावर असलेल्या बदलापूरमध्ये झालेल्या या प्रकारामुळे जनक्षोभ उसळला होता, अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण होतं. हे प्रकरण प्रचंड गाजलं. मात्र या दुर्दैवी घटनेच्या, जखमा मनात अजूनही ताज्या असतानाच त्याच बदलापूरमध्ये असाच एक भयानक, नृशंस प्रकार पुन्हा झाल्याच उघडकीस आलं आहे.
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका चिमुकलीवर अत्याचारा प्रयत्न करण्यात आल्याची घचना समोर आली आहे. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आहे. बदलापूर पश्चिमेला ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाती आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार असून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.
नेहमीप्रमाणे लेक घरी आली नाही, आईच्या मनात शंकेने थैमान
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही अवघ्या चार वर्षांची असून ती बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत शिकत होती. शाळेत येण्या-जाण्यासाठी तिला व्हॅन लावण्यात आली होती. एरवी ती दुपारी 12.30 पर्यंत घरी यायची मात्र घटनेच्या दिवशी 12.30 वाजून गेल्यानंतरही ती स्कूलव्हॅन मधून घरी परत आली नाही. त्यामुळे तिची आई चिंतेत होती. तिने अखेर स्कूल व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली.
त्यानंतर साधारण दीड तासानंतर पीडित चिमुकली घरी आली. मात्र ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. ते पाहून तिच्या आईला काळजी वाटली. तिने गोड बोलून, तिला समजावून काय झालं, काय घडलं असं मुलीला विचारत तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने जे सांगितलं ते ऐकून त्या माऊलीच्या पायाखालची जमीनच हादरली. नेमकं काय घडलेलं ते त्या भेदरलेल्या चिमुकलीने कसंबसं आईला सांगितलं. आरोपी व्हॅन चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने तिच्या आईला सांगितलं.
आरोपीला ठोकल्या बेड्या
हे ऐकून तिची आई हादरली, मात्र कशीबशी हिंमत गोळा केली आणि त्यानंतर त्या चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी व्हॅन चालकाचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या तसेच त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला.
दरम्यान हा प्रकार समजताच शहरात खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी त्या स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आज आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
खाजगी व्हॅन वर RTO ची कारवाई
याप्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. ज्या व्हॅनमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला ती खाजगी व्हॅन असल्याचे समोर आले असून RTO विभागाने त्यावर कारवाई केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील ‘ती’ व्हॅन अवैध असून त्या व्हॅनला आरटीओ परवानगी नसल्याची माहितीही समोर आली आहे. या खाजगी व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती अशी माहितीही उघड झाली आहे. आरटीने त्या व्ह2नवर कारवाई करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून त्या व्हॅनचा परवानाही रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांची पायमल्ली होत असेल तर… गृहराज्यमंत्र्यांचा इशारा
नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवार कारवाई होईल असा इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला आहे. गृहविभाग आणि शालेय शिक्षण विभागाकडून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असं ते म्हणाले.
तर बदलापूरमध्ये आधी अत्याचार झाला होता, त्या प्रकरणात कारवाई केली होती. तशीच या केसमध्येही आम्ही कठोर कारवाई करू. आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलिस आमपलं काम चोखरित्या करत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.