
देशभरात आयपीएलची क्रेझ सध्या प्रचंड वाढली आहे. आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देत चाहते उत्साहात सामना पाहत आहेत. पण याच क्रिकेटच्या रंगतदार वातावरणात एक काळी बाजूही झपाट्याने पसरत चालली आहे ती म्हणजे ऑनलाइन सट्टेबाजी!
सामना जिंकला की नाही, फलंदाज किती धावा करणार, पुढचा बॉल कसा असेल, कोणता संघ अंतिम फेरी गाठणार अशा प्रत्येक गोष्टीवर पैसे लावले जात आहेत. आणि झटपट पैसा कमावण्याच्या या मोहात अनेक तरुण आपलं आयुष्य अडचणीत टाकत आहेत.
सट्ट्याचा हा सगळा व्यवहार फारच गुप्तपणे चालतो. बुकी नावाचे लोक यामागे प्रमुख भूमिका बजावतात. हे बुकी बहुतेक वेळा लहान शहरांतून किंवा अगदी एखाद्या खोलीत बसून ऑनलाइन नेटवर्कद्वारे सट्टा चालवतात.
त्यांनी मॅचच्या परिस्थितीनुसार, अगदी प्रत्येक बॉलवर किंवा ओव्हरवर पैशाचे भाव ठरवलेले असतात. लोक Mobile Wallets किंवा बँक खात्याद्वारे पैसे ट्रान्सफर करून सट्ट्यात सहभागी होतात. अशा पद्धतीने व्यवहार रोखीशिवाय होतो, म्हणून पोलिसांना हे जाळे शोधणं कठीण जातं.
भारतामध्ये सट्टा खेळणे किंवा खेळवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही ठिकाणी सरकारकडून मान्यता असलेली लॉटरी किंवा कॅसिनो वगळता, कोणताही जुगार आणि सट्टा हा गुन्हाच मानला जातो.
आयपीएल मॅचेसवर सट्टा लावणे हे देखील याच कायद्यात येते आणि त्याला कोणतीही कायदेशीर परवानगी नाही.
जर कोणतीही व्यक्ती सट्टा खेळताना किंवा खेळवताना पोलिसांच्या हाती लागली, तर तिच्यावर थेट कारवाई केली जाते.
1. ‘Public Gambling Act, 1867’ या कायद्यानुसार पोलिसांना सट्टेबाजांना अटक करण्याचा अधिकार आहे.
2. अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले जाते.
3. गुन्हा सिद्ध झाल्यास ₹200 दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास, किंवा काही वेळा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकते.
याशिवाय राज्य सरकारच्या जुगारविरोधी कायद्यांनुसारही कधी कधी अधिक कठोर शिक्षा होऊ शकते.