स्मशानात हे काय? बाहुल्यांसोबत मुलामुलींचे फोटो?; जिल्ह्यात खळबळ

| Updated on: Mar 28, 2024 | 8:13 PM

सांगलीमध्ये एक धक्कादायक, अघोरी प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. स्मशानभूमीमध्ये काळ्या कापडातील बाहुल्या, त्यावर मुला-मुलींचे फोटो आणि त्यावर धारदार दाभण खुपसण्यात आल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला.

स्मशानात हे काय? बाहुल्यांसोबत मुलामुलींचे फोटो?; जिल्ह्यात खळबळ
सांगलीत अघोरी प्रकार उघड
Follow us on

सांगलीमध्ये एक धक्कादायक, अघोरी प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. स्मशानभूमीमध्ये काळ्या कापडातील बाहुल्या, त्यावर मुला-मुलींचे फोटो आणि त्यावर धारदार दाभण खुपसण्यात आल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळी पौर्णिमेपासूनच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावाजवळील स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. अखेर बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झाली होती. दरम्यान, या बातमीला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या बातमीची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी. आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ. सुदाम माने,विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली. तसेच संशयितावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणीदेखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.

या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास करू असे कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील कोणत्याही मुला-मुलींची ओळख जाहीर केली जाणार नाही, गोपनीय रित्या तपास करून याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करू असेही पोलिसांनी नमूद केले. स्मशानभूमीत आढळलेले सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोषींना लवकर शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली.