बॉलीवूडमधील ‘ही’ अभिनेत्री निर्दोष असल्याचे उघड, ‘या’ प्रकरणात झाली होती अटक

काही दिवसांपूर्वी एका बॉलीवूड अभिनेत्रीला शारजाह विमानतळावर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी यात मोठा खुलासा केला आहे.

बॉलीवूडमधील ही अभिनेत्री निर्दोष असल्याचे उघड, या प्रकरणात झाली होती अटक
अभिनेत्री क्रसॅन परेरा निर्दोष
Image Credit source: Google
| Updated on: Apr 25, 2023 | 8:26 PM

ब्रिजभान जैस्वार, मुंबई : काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेली सडक 2 चित्रपटाची अभिनेत्री क्रिसॅन परेरा ही निर्दोष सिद्ध झाले आहे. क्रिसॅन‌ परेरा हिला काही दिवसांपूर्वी शारजाह विमानतळावर अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र तिला फसवलं गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अशा प्रकारे अनेक जणांना फसविल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

क्रिसॅन‌ परेरासोबत असलेल्या ट्रॉफीमध्ये अंमली पदार्थ पोलिसांना सापडले आणि त्यामुळे आजही ती स्थानिक जेलमध्ये आहे. मात्र तिला फसवलं गेल्याचं आता उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अँथोनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बोभाटे उर्फ रवी यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यांच्या कथित जाळ्यात अडकलेली क्रिसॅन‌ ही एकटी नाही. बोरिवलीतील एक डिस्क जॉकी क्लेटन रॉड्रिग्जला देखील अशाच प्रकारे अडकवल्याचा या दोघांवर आरोप आहे.

क्रिसॅनला वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी तर क्लेटनला डीजेच्या कामासाठी त्यांनी शारजाहला पाठवले. क्रिसॅन‌ सोबत यांनी एक ट्रॉफी दिली होती, तर रॉड्रिग्जला एक केक दिला होता. मात्र या ट्रॉफी आणि केकमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती दोघांना नव्हती. विशेष म्हणजे या दोघा नराधमांनी क्रिसॅन‌ आणि रॉड्रिग्ज यांच्यासह आणखीन तिघांना अशाच प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने तो यशस्वी झाला नाही.

प्रकरण काय?

क्रिसॅन‌च्या आईचा कुत्रा हा अँथोनीच्या बहिणीवर धावून गेला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता, तर रॉड्रिग्ज सोबत देखील त्याचा काही वाद होता. तसेच इतरांसोबतही त्याचे काही ना काही वाद होतेच आणि त्याचा बदला म्हणून आोरपींनी हे सगळं केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अँथोनी हा एक रिअल इस्टेट एजंट असून, त्याच्या बोरीवलीत दोन बेकऱ्या देखील आहेत. तर राजेश बँकेत असिस्टंट मॅनेजर आहे. मंगळवारी या दोघांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने या दोघांना सात दिवसांची म्हणजे 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.