Sunetra Pawar : मोठी बातमी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार, निवड एकमताने झाली का?
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव कोणी मांडला? कोणी अनुमोदन दिलं? ही सर्व प्रक्रिया कशी पार पडली? ही निवड एकमताने झाली का? जाणून घ्या.

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा ढवळून निघेल चार दिवसांपूर्वी असा विचारही कोणाच्या मनाला शिवला नसेल. पण अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यानंतर गोष्टी वेगाने बदलल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले आहेत. मात्र आता अजित पवारांची मंत्रालयातील जागा कोण घेणार? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या हाती असणार? अजित दादांचा राजकीय वारसा कोण चालवणार? या चर्चांनी वेग पकडलाय. त्याची उत्तर पुढच्या काही तासात महाराष्ट्राला मिळतीलच. अजित पवारांचं असं अकाली निघून जाणं हा सर्वांसाठीच मोठा धक्का आहे. अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही.
अजित पवारांच्या रुपाने महाराष्ट्राने एक कर्तुत्ववान नेता या विमान अपघातात गमावला. आता अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी हा वारसा पुढे नेतील. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण 42 आमदार आहेत.
निवडीची प्रोसेस कशी झाली?
आधी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्याचं अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील. आज दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्तावर मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अन्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करायला समर्थन दिलं.
सुनेत्रा पवार यांच्याकडे कुठली खाती?
अशा पद्धतीने सुनेत्रा पवार यांची निवड झाली. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा राज्यपाल भवनात शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे कुठल्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून सोपवण्यात येईल या बद्दल सध्या तरी काही माहिती नाहीय. त्या आधी राज्यसभेत खासदार होत्या.
