Gold-Silver Crash: चांदीचा बुडबुडा फुटला; एकाच दिवसात 1 लाखांची स्वस्ताई, सोन्यात सर्वात मोठी पडझड
Gold And Silver Crash: केवळ एकाच दिवसात सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. गुरूवारी उच्चांकी झेप घेणार्या चांदीत आज मोठी पडझड दिसली. तर त्यापाठोपाठ सोनेही घसरले. त्यामुळे ग्राहकांना आकाशही ठेंगणं झालं. काय आहेत आता किंमती?

Gold And Silver Crash: सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात चांदीचा भाव एक लाखाने घसरला. चांदीचा बुडबुडा फुटला. तर सोन्यातही मोठी घसरण नोंदवली गेली. एका झटक्यात 10 ग्रॅम सोने 33,000 रुपयांनी स्वस्त झाले. हे चित्र केवळ वायदे बाजारातच आहे असे नाही तर घरगुती बाजारातही या मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. तज्ज्ञ यापूर्वीच सोने आणि चांदी उच्चांकी झेप घेऊन कोसळले असा दावा करत होते. आता तसंच झालं. या घडामोडींमुळे ग्राहकांना आकाशही ठेगणं झालं आहे. सोने आणि चांदीच्या ताज्या किंमती काय आहेत, जाणून घ्या…
चांदीचा बुडबुडा फुटला
तज्ज्ञांच्या अंदाज अखेर खरा ठरला. चांदीचा बुडबुडा फुटला. एका दिवसात एक किलो चांदीचा भाव एक लाख रुपयांनी आपटला. वायदे बाजारात(MCX) गुरूवारी दोन्ही धातुत मोठी घसरण नोंदवली गेली. चांदीने 3,99.893 रुपये प्रति किलो अशी ऐतिहासिक उंची गाठली. तर शुक्रवारी वायदे बाजार बंद होताना 5 मार्चच्या वायद्यासाठी चांदीचा भाव कोसळला. एक किलो चांदीची किंमत 2,91,922 रुपयांवर आली. एका झटक्यातच एक किलो चांदी 1,07,971 प्रति किलोने स्वस्त झाले.
चांदी दणकावून आपटली
गुरुवारी चांदीच्या किंमतींनी रॉकेट भरारी घेतली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीचा भाव ऐतिहासिक 4 लाख रुपये प्रति किलोवर पोहचला. चांदी 4,20,048 रुपये प्रति किलोवर पोहचली. पण या उच्चांकावर अधिक काळ कायम राहणे चांदीला अशक्य झाले. चांदी लागलीच धराशायी झाली. चांदीने गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. चांदी तिच्या उच्चांकावरून 1,28,126 रुपयांनी स्वस्त झाली. सध्याच्या अस्थिरतेचा फायदा काही काळ चांदीच्या गुंतवणूकदारांना मिळाला.
सोने दणकावून आपटले
केवळ चांदीच नाही तर सोन्याचा बुडबुडा सुद्धा फुटला. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने एकाच दिवसात 33,113 रुपयांनी आपटले. चांदीत मोठी घसरण झाल्यानंतर सोन्यातही मोठी पडझड झाली. MCX वर 2 एप्रिल रोजी संपणांऱ्या सोन्याचा वायदा बाजारातील भाव गुरूवारी 1,83,962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. शुक्रवारी हा भाव घसरून 1,50,849 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. गुरूवारी सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकावर 1,93,096 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर किंमती दणकावून आपटल्या. सोने उच्चांकावरून 42,247 रुपयांनी स्वस्त झाले.
