Kalyan Crime : पती-पत्नीमध्ये वाद झाला, मग मध्यस्थीसाठी आलेल्या मेव्हण्याने भावोजीला थेट…

पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात मेव्हणा पडला आणि होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Kalyan Crime : पती-पत्नीमध्ये वाद झाला, मग मध्यस्थीसाठी आलेल्या मेव्हण्याने भावोजीला थेट...
पती-पत्नीच्या वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवले
| Updated on: Aug 05, 2023 | 5:29 PM

कल्याण / 5 ऑगस्ट 2023 : पती-पत्नीच्या वादात मेव्हण्याने उडी घेतली आणि बहिणीचं कुंकूच पुसल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मेव्हण्याने भावोजीची हत्या करुन मृतदेह उल्हास नदीत फेकला. कल्याण खडकपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. शहबाज सफिक शेख असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. उल्हास नदीत मृतदेहाचा शोध सुरु आहे. अद्याप मृतदेह हाती लागला नाही. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. शोहेब शर्यत शेख, हेमंत वीरभद्र बिछवाड आणि इजराइल शर्यत शेख अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

शहबाज शेख आणि त्याची पत्नी मुमताज शेख यांच्यात कौटुंबिक वाद झाले होते. या रागातून मुमताज दोन्ही मुलांना घेऊन माहेरी रहायला गेली होती. शहबाज पत्नी आणि मुलांना भेटायला तिच्या माहेरी गेला. यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दोघांचा भांडणाचा आवाज ऐकून मुमताजचे वडील आणि भाऊ तेथे आले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र शहबाज ऐकायला तयार नव्हता. यानंतर शहबाजने आपल्या छोट्या मुलाला घेतले आणि तो जाऊ लागला. मात्र मुमताजच्या भावाने त्याला अडवले आणि मुलाला परत घेतले.

यानंतर दोघे मेव्हणे आणि अन्य एक जण यांनी शहबाजला रिक्षात टाकले आणि कुठेतरी घेऊन जाऊ लागले. यावेळी शहबाज ओरडत होता, म्हणून हेमंत बिछवाड याने त्याचा गळा आवळून त्याला ठार केले. यानंतर अंगावरील कपडे काढून घेत मृतदेह शहाड येथे नेत उल्हास नदीत फेकून दिला. घटनेला 24 तास उलटले तरी मृतदेह अद्याप सापडला नाही. पोलीस अग्निशामक दलाच्या मदतीने शोध घेत आहेत.