रागाच्या भरात भावाने केलं असं कृत्य…; परळीतील धक्कादायक घटनेने शेतकरी हादरले
परळी तालुक्यातील सारडगाव येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली. एका भावाने दुसऱ्या भावाच्या तीन एकर कपाशीच्या पिकावर तणनाशक फवारून ते नष्ट केले. पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल केला आहे.

परळी तालुक्यातील सारडगाव येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. कौटुंबिक वादामुळे मनात राग धरून एका भावानेच आपल्या दुसऱ्या भावाच्या शेताचे नुकसान केले आहे. त्याने शेतातील ३ एकर कपाशीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी करून ते पूर्णतः नष्ट केले आहे. या घटनेमुळे पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तो आर्थिक संकटात सापडला आहे.
नेमकी घटना काय?
परळीतील सारडगाव येथील शेतकरी नारायण नवनाथ गोल्हेर यांनी गट क्रमांक ७६ आणि २११ मधील आपल्या ३ एकर शेतीत मोठ्या मेहनतीने कपाशीची लागवड केली होती. पिकाची स्थिती अत्यंत चांगली होती. त्याला भरपूर बोंडंही लागली होती. नारायण गोल्हेर यांनी या पिकासाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते. यातून त्यांना पाच ते साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.
मात्र, याच दरम्यान नारायण गोल्हेर आणि त्यांचे भाऊ शिवाजी नवनाथ गोल्हेर यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून सूडबुद्धीने शिवाजी गोल्हेर याने रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून ‘राऊंड अप’ नावाचे तणनाशक मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकावर फवारले. या विषारी फवारणीमुळे डोळ्यादेखत संपूर्ण कपाशीचे पीक करपून नष्ट झाले.
गुन्हा दाखल, प्रशासनाकडे मदतीची मागणी
या धक्कादायक घटनेनंतर पीडित शेतकरी नारायण गोल्हेर यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी शिवाजी गोल्हेर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२४, ३५२/२, आणि ३५१/३.३/५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या नारायण गोल्हेर यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
“माझ्या तीन एकर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून मला योग्य ती आर्थिक मदत द्यावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, भावानेच केलेल्या या कृत्यामुळे कौटुंबिक संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
