
पतीचं बाहेर कुठेतरी अफेअर असल्याच्या संशय आल्यावर पत्नीने पतीला जाब विचारला, मात्र तोच प्रश्न तिच्या जीवावर उठला. पत्नीच्या संशयामुळे संतापलेल्या पतीने तिच्या अगांवर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली शहरात घडली. मात्र सुदैवाने ती महिला बचावली. याप्रकरणी पत्नी नमिता काकडे यांनी चिखली पोलीसांत धाव घेत तक्रार दाखल केली, त्यानंतर चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष विशाल काकडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ माजली आहे.
प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 साली नमिता काकडे आणि विशाल काकडे यांचा विवाह झाला. त्यांना 2 मुलंही आहे. नमिता ही नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायची. तिला पती विशालवर संशय होता. त्याचं इतर मुलींशी अफेअर असल्याचं तिला वाटत होतं. त्यावरूनच त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद व्हायचा.
कालही त्या दोघांमध्ये असाच वाद झाला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये खूप वाजलं. भांडण विकोपाला गेलं आणि पती विशाल याने त्याची पत्नी नमिता हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पत्नी नमिता हिने समयसुचकता दाखवली आणि तिने पेटलेली साडी पाण्याने भिजवून आपला जीव वाचवला.
Mumbai Crime : मी जेवणार नाही… मित्रांना सांगणं पडलं महागात ! त्याच रात्री मृत्यू.. नेमकं काय घडलं ?
चिथावणी दिल्यावर धक्कादायक कृत्य
काल विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून वाद झाले. तितक्यात विशाल याला अज्ञात महिलेचा फोन आला. यावेळी पत्नीने कुणाचा फोन आहे असं विचारलं , त्यावरून पुन्हा वाद झाला. तेव्हा नमिताची सासू आणि नणंद या वर गेल्या आणि मुलगा विशाल याच्याशी बोलू लागल्या. नमिताचं हे वागणं नेहमीचंच आहे, आज हिचा काटा काढूनच टाकू अशी त्यांनी त्याला चिथावणी दिली. त्यानंतर चिडून विशालने पत्नीला बेडरूम मध्ये नेले व बाटलीत ठेवलेलं पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले . मात्र नमिताने प्रसंगावधान राखत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला.
त्यानतंर नमिताने चिखली शहर पोलिसात घाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल काकडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विशाल सह सासू व नणंदेविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.