Mumbai Crime : मी जेवणार नाही… मित्रांना सांगणं पडलं महागात ! त्याच रात्री मृत्यू.. नेमकं काय घडलं ?
जावेद हा कुर्ला पश्चिम येथील जरीमरी परिसरातील एकता सोसायटीत राहत होता. सोमवराी रात्री त्याच्या मित्रांनी त्याला जेवण आणण्यास सांगितलं. पण मी जेवणार नाही, तुम्हीच जेवण आणा असं त्याने मित्रांना सांगितलं आणि तेच भोवलं...

रागावर नियंत्रण ठेवा, राग डोक्यात जाऊ देऊ नका, शांत रहा असं आपली वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात. कारण रागाच्या भरात एखादी गोष्ट केली, पाऊल उचललं तर ते महागात पडू शकतं आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काही उरत नाही. पण त्याचाही काही फायदा नसतो कारण वेळ निघून गेलेली असते, झालेलं नुकसान काही भरून काढता येत नाही. आणि हाच राग एखाद्याच्या जीवावर बेतला तर ?
मुंबईतील साकीनाका असाच एक भयानक प्रकार घडला आहे, जिथे एका शुल्लक कारणावरून 4 जणांची त्यांच्याच मित्राला जबर मारहाण केली, त्याल काठीनेही बदडलं. यात त्या तरूणाचा हकनाक बळी गेला, त्याला जीव गमवावा लागला. जेवण न आणल्यामुळे संतापलेल्या चार मित्रांनी तरूणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना मंगळवारी अटक केली.
मी जेवणार नाही, तुम्ही तुमचं घेऊन या… भडकलेल्या मित्रांचा तरूणावर जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद अहमद आशिक अली खान (वय 43) असे मृत इसमाचे नाव आहे. तो कुर्ला पश्चिम येथील जरीमरी परिसरातील एकता सोसायटीत राहत होता. त्याच्यासोबत मोहम्मद सहबाज सज्जाद हुसेन खान (वय 21 ), जमाल हुसेन मोहम्मद हुसेन खान (वय 42 ), सज्जाद हुसेन मोहम्मद हुसेन खान (वय 42) आणि मोहम्मद आरिफ मोहम्मद हुसेन खान (वय 32) हे चौघेदेखील तिथेच रहात होते.
सोमवारी, 3 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास त्या चौघांनी जावेदला सांगितलं की हॉटेलमधून जेवण घेऊन ये. मात्र जावेदने जेवण आणण्यास नकार दिला. मी काही जेवणार नाहीये, त्यामुळे तुम्हीच तुमचं जेवण घेऊन या असं म्हणत त्याने मित्रांसमोरच जेवण आणण्यास नकार दिला. पण यामुळे ते चौघेही अतिशय भडकले. त्यानंतर त्या चौघांनी मिळून जावेदला प्रचंड लाथा-बुक्क्या हाणल्या, त्याला मारहाण केली. एवढ्यावरच त्यांचा क्रूरपणा थांबला नाही, तर त्यांनी आपल्याच मित्रावर काठीनेही जोरदार प्रहार केले.
या मारहाणीमुळे जावेद हा गंभीर जखमी झाला. त्याने कसाबसा जवळच राहणाऱ्या आपल्या मामांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच जावेदचे मामा अब्दल कादीर खान तिथे पोहेचले आणि जावेदनची ्वस्था पाहून हादरले. त्यांनी तरूणांना मारहाणीबद्दल जाब विचारला, पण डोक्यात राग घुसलेल्या त्या चौघांनी मामालाही मारण्याची धमकी दिली.
रुग्णालयात मृत्यू
अखेर मामा अब्दुल यांनी गंभीर जखमी झालेल्या जावेदला कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचारांसाठी नेले, तिथे दाखल केले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता, वेळ हातातून निघून गेली होती. डॉक्टरांनी जावेदला तपासू त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी साकीनाका पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी मोहम्मद सहबाज सज्जाद हुसेन खान (वय 21 ), जमाल हुसेन मोहम्मद हुसेन खान (वय 42 ), सज्जाद हुसेन मोहम्मद हुसेन खान (वय 42 ) आणि मोहम्मद आरिफ मोहम्मद हुसेन खान (वय 32) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिस अधिक तपास करत आहेत.
