
आई हे वात्स्यालयाचे, ममतेचे प्रतीक मानले जाते, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १७ वर्षीय मुलीच्या आईनेच तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पोळी नीट बनवता येत नाही या क्षुल्लक कारणावरून आईने आपल्या पोटच्या मुलीला चक्क गरम वस्तूने चटके दिले. यानंतर तिला उपाशीपोटी गच्चीवर झोपायला भाग पाडले. या क्रूर कृत्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील कमळापूर येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच आई-वडिलांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मूळची राजस्थानची असून लॉकडाऊनच्या काळात तिचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले होते. इथे आल्यापासून तिला आई-वडिलांकडून नियमितपणे शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. याबद्दल त्या पीडित मुलीने पोलिसांत जबाब नोंदवला आहे.
मला अनेकदा मारहाण केली जायची. तसेच चपाती नीट बनवता न आल्याने माझ्या आईने मला गरम वस्तूने चटके दिले. एवढेच नाही तर मला कधीकधी जेवायला दिले जात नव्हते. अनेकदा बाथरूममध्ये किंवा घराच्या गच्चीवर उपाशीपोटी झोपण्यास भाग पाडले जायचे. १ जानेवारी २०२० ते ९ जानेवारी २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत मला अशाप्रकरची अमानवी वागणूक मिळत होती, असे त्या मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीला कंटाळून अखेर या मुलीने हिंमत दाखवत तक्रार करण्याचा निर्णय घ्यायचा. तिने स्वतःच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांसमोर आपली आपबीती सांगितली. पोलिसांनी तिचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले. तिला धीर दिला. तिच्या तक्रारीवरून तातडीने तिच्या आई-वडिलांविरोधात शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बालगृह मुलींच्या छळामुळे चर्चेत आले होते. तिथून काही मुलींनी पळ काढत बालगृहात होणारे अत्याचार पोलिसांसमोर आणले होते. ज्यामुळे बालगृहाचा खरा चेहरा समोर आला होता. मात्र, वाळूजमधील या घटनेने केवळ बालगृहच नव्हे, तर अनेक घराघरात मुलींचा असाच छळ होत असल्याचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पालकांकडूनच अशाप्रकारे मुलींचा छळ होणे हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.