
हे डिजिटल युग आहे. तुमच्या कोणत्याच गोष्टी लपून राहत नाहीत, असे म्हणतात. केवळ 200 रुपयांचे एक ऑनलाईन पेमेंट फेल झाले नि नवरोबाचे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर उघडे पडले. त्याचे घरीवाली आणि बाहरवालीच्या रहस्यावरून पडदा उघडला. पण त्याने कोणत्या गोष्टीसाठी पेमेंट केले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याने जे कांड केले ते त्याच्यामुळेच समोर आले. आता त्याचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे.
पेमेंट फेल, समोर आला नवऱ्याचा खरा चेहरा
हे प्रकरण चीनमधील आहे. ग्वांगडोंग भागातील यांगजियांग या शहरात ही व्यक्ती तिच्या पत्नीसोबत राहते. तो औषधी दुकानातून, मेडिकलमधून गर्भनिरोधक गोळी खरेदी करण्यासाठी पोहचला. त्याने 15.8 युआन म्हणजे 200 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले आणि तो औषधी घेऊन निघून गेला. पण व्यवहारातील काही अडचणींमुळे हे ऑनलाईन पेमेंट फेल झाले. येथेच त्याचे नशीब रडले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या घटनेचे वृत्त दिले.
दुकानदाराने केला फोन
गर्भनिरोधक गोळ्यांचे ऑनलाईन पेमेंट फेल झाल्यानंतर दुकानदाराने त्या व्यक्तीला फोन केला. हा कॉल व्यक्तीने नाही तर त्याच्या पत्नीने उचलला. दुकानदाराने पेमेंट फेल झाल्याची माहिती दिली. त्यावेळी पत्नीने पतीने काय खरेदी केले नि किती पेमेंट थकले याची माहिती विचारली. दुकानदाराने मग सगळा इतिवृत्तांत कथन केला. मग घरात जे महाभारत सुरू झाले, याची त्या भाबड्याला कल्पनाच आली नाही. दुकानदाराला तर त्याचे पेमेंट मिळाले. पण त्याच्या एका फोनने पतीचे विवाहबाह्य संबंध उघड झाले. पत्नीने गर्भनिरोधक गोळ्या कोणासाठी मागवल्या असा प्रश्न विचारताच पुढे रामायण घडले आणि पत्नी घर सोडून निघून गेली. तिने पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली. पण या कथेत अजून एक ट्विस्ट समोर आला.
पतीचा दुकानदारावरच मानहानीचा दावा
आता हा सर्व प्रकार दुकानदारांमुळेच उघड झाल्याचा संताप पतीने व्यक्त केला. पेमेंट फेल झालं तर तो नेहमीचा ओळखीचा दुकानदार होता, त्याने थोडी कळ सोसली असती तर त्याचा संसार तुटला नसता असा आरोप नवऱ्याने केला आहे. त्याच्या या अजब दाव्याने दुकानदाराला ही धक्का बसला. आपली यात काहीच चूक नसल्याचे दुकानदार म्हणाला. पण नवऱ्याने खासगी आयुष्यात डोकावून भांडण लावल्याचे कारण पुढे करत दुकानदारावरच मानहानीचा दावा केला. तो पत्नीला समजावण्यासाठी सासरी वाऱ्या करत असल्याचे समोर येत आहे.