POCSO Act : मुलांचे चुंबन घेणे, मिठीत घेणे गुन्हा नाही, न्यायालयाचे मत, पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता!

विशेष न्यायालयाने एका बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. लहान मुलाला मिठीत घेणे किंवा त्याचे चुंबन घेणे ही सामान्य बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

POCSO Act : मुलांचे चुंबन घेणे, मिठीत घेणे गुन्हा नाही, न्यायालयाचे मत, पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता!
pocso crime news
| Updated on: Sep 10, 2025 | 6:07 PM

POCSO Act : अल्पवयीन मुलांसोवर होणार लैंगिक अत्याचार, लैंगिक हिंसा रोखण्यासाठी पोक्सो हा महत्त्वाचा कायदा आहे. विशेष म्हणजे या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल झाल्यास संबंधित मुलाची किंवा मुलीची ओळख गुप्त ठेवली जाते. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत अनेक नराधमांना कठोर शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. तर काही प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील एका प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीच्या गालाचे चुंबन घेतल्याचा आरोप होता. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे.

मिठी मारण्याला गुन्हा मानले जाऊ शकत नाही

मिळालेल्या माहितीनुसार एका तीन वर्षीय मुलीसोबत झालेल्या कथित छेडछाड प्रकरणी ठाण्यातील विशेष न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. लहान मुलीचे चुंबन घेणे आणि मिठी मारण्याला गुन्हा मानले जाऊ शकत नाही. कारण हे कृत्य करताना आरोपीचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, असे न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले आहे. ही घटना 9 जानेवारी 2021 साली घडली होती.

निर्णय देताना न्यायालयाने नेमके काय मत नोंदवले?

विशेष न्यायालायने 22 ऑगस्ट रोजी या प्रकरणात निकाल दिला होता. लहान मुलांवर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती स्वाभाविकपणे लहान मुलाला जवळ घेते आणि गालावर प्रेमाने चुंबन करते. आपल्या समाजात ही एक सामान्य बाब आहे. या प्रकरणातील आरोपी त्याच भागात राहणार आहे. लहान मुलीसाठी तो अनोळखी नव्हता. त्यामुळे आरोपीने केलेले हे कृत्य पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, असे मानले जाऊ शकत नाही, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदवले.

नेमकं प्रकरण काय आहे?

आरोपी ओमप्रकाश रामबचन गिरी यांनी 9 जानेवारी 2021 रोजी 2 वेळा एका तीन वर्षाच्या मुलीला मिठीत घेतलं आणि गालावर चुंबन घेतले. घडलेला हा प्रसंग एका 12 वर्षीच्या मुलीने तसेच अन्य एका मुलाने 3 वर्षीय मुलीच्या आईला सांगितला होता. त्यानंतर गिरी यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी निकाल दिला.

गिरी यांची निर्दोष सुटका कोणत्या आधारावर झाली?

घडलेली ही घटना मुलीच्या आईने पाहिली नव्हती. तसेच घडलेल्या कथित प्रसंगाबद्दल माहिती देणाऱ्या एका साक्षीदाराचा जबाब पोलिसांनी घेतला नव्हता. तक्रारीत अल्पवयीन मुलीच्या गालावर खरचटले असल्याचे सांगितले होते. तपास अधिकाऱ्याने मुलीची वैद्यकीय तपासणीदेखील केली नव्हती. कथित पीडित मुलीचा जबाब ती सात वर्षांची झाल्यानंतर घेण्यात आला. न्यायालयाने हा जबाब विश्वसनीय नसल्याचे सांगितले. याच सर्व कारणांमुळे आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.