तिकिटावरुन वाद झाला, मग पीएमपीएमएल बस कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांना भिडले !

| Updated on: Mar 30, 2023 | 5:38 PM

भोसरी बस डेपोची बस चाकणहून परतीच्या मार्गावर होती. यावेळी तिकिटावरुन बस कंडक्टर आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. काही वेळात हा वाद टोकाला गेला.

तिकिटावरुन वाद झाला, मग पीएमपीएमएल बस कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांना भिडले !
तिकिटावरुन कंडक्टर आणि प्रवाशामध्ये राडा
Image Credit source: TV9
Follow us on

पिंपरी चिंचवड / रणजित जाधव : तिकिटावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसचा कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांना भिडल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणानंतर चालकाने बस आधी मोशी पोलीस चौकीत नेली, मात्र तिथे पोलीस नसल्याने बस थेट भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेली. बस पोलीस ठाण्यात नेल्यानंतर या घोळामुळे सर्व प्रवाशांना विनाकारण तासभर ताटकळत बसावं लागलं. याप्रकरणी मोशी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिकिटावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला

भोसरी डेपोची बस भोसरीवरून चाकणला गेली. तेथून पुन्हा परतीचा प्रवास सुरु असताना तिकिटावरुन आंबेठन चौकात हा वाद झाला. किरण श्रीखंडे हा प्रवासी आंबेठन चौकात बसमध्ये बसला. त्याने मोशीपर्यंतचे 15 रुपयांचे तिकिट काढले. त्यापुढे एक दिवसाचा 50 रुपयांचा पास त्याने मागितला. पण गैरसमजातून कंडक्टरने पुन्हा मोशीपर्यंतचे तिकिट काढले.

भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

याचवरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. भांडण मिटत नसल्याचं पाहून चालकाने बस मोशी पोलीस चौकीत नेली. तिथं पोलीस उपस्थित नव्हते, मग शेवटी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बस आणली गेली. कंडक्टर आणि प्रवासी किरण श्रीखंडे यांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या. पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. या घोळात तासभर प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं, नंतर बस पुढे मार्गस्थ झाली.