भाड्याच्या घरात थरार, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, हिंमतीने वाचवले स्वतःचे प्राण

डोंबिवलीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने दाखवलेल्या धाडसाने हा प्रयत्न फसला. तिने प्रतिकार करून स्वतःचा जीव वाचवला. कुटुंबियांनी तातडीने तक्रार केली.

भाड्याच्या घरात थरार, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, हिंमतीने वाचवले स्वतःचे प्राण
| Updated on: Oct 15, 2025 | 8:10 AM

डोंबिवलीतील एका परिसरात अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या ३७ वर्षीय नराधमाने विनयभंग करत जबरदस्तीने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही १६ वर्षीय मुलीने दाखवलेल्या धाडसी हिंमतीमुळे नराधमाचा डाव फसला. त्यामुळे तिने स्वतःचा जीव वाचवला.

नेमकं काय घडलं?

पीडित मुलगी आणि आरोपी इकबाल नन्हेबक्ष अन्सारी (३७) हे दोघेही डोंबिवलीतील आयरे गावात एकाच घरात भाड्याने राहत होते. काही दिवसांपूर्वी आरोपी अन्सारी याने घरात अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधली. त्याने मुलीला घरात एकटी गाठून तिच्यावर विकृत हेतूने जबरदस्ती करत विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिच्यावर अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे नात्यांना आणि विश्वासाला तडा गेला.

मात्र त्या मुलीने अन्सारीच्या या धक्कादायक आणि विकृत कृत्याला घाबरून न जाता अभूतपूर्व धाडस दाखवले. तिने आपल्या पूर्ण ताकदीनिशी नराधमाचा जोरदार विरोध करत त्याला प्रतिकार केला. मुलीने केलेल्या या विरोधानंतर तो नराधम घाबरला. मुलीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. यानंतर तिने आरडाओरड केली. या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली. यानंतर कुटुंबियांनी तातडीने मुलीला घेऊन डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी इकबाल नन्हेबक्ष अन्सारी याचा शोध सुरू केला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तपास करत आरोपीला डोंबिवलीतील आयरे गावातून जेरबंद केले. पोलिसांनी या नराधमाविरोधात POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या रामनगर पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी या नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या धाडसी मुलीच्या प्रतिकारामुळे एक मोठा अनर्थ टळला असून, तिच्या हिंमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.