
आपला भारत देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आजही काही कुप्रथा समाजात आढळत आहेत. आजही देशाच्या काही भागात हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ केला जातो. अशातच आता उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कानपूरच्या कर्नलगंज पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेला सासरच्या लोकांनी 5 लाख रुपये हुंडा न दिल्याबद्दल नरक यातना दिल्या आहेत. सासरच्या लोकांनी चक्क या महिलेल्या अंगावर साप सोडला. यानंतर आता 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सासरची मंडळी एका विवाहितेकडे हुंडा मागत होती. मात्र हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने, सासरच्यांनी तिला एका खोलीत बंद केले आणि आत एक विषारी साप सोडला. हा साप त्या विवाहितेला चावला. त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या, ती वेदनेने तडफडत होती. मात्र तिला वाचवण्याऐवजी सासरचे लोक तिच्यावर हसत होते. मात्र पीडितेच्या बहिणीने या महिलेला बाहेर काढले आणि तिला रुग्णालयात नेले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कानपूरच्या चमनगंज येथील रहिवासी रिझवानाने अशी तक्रार केली की, तिची बहीण रेश्मा हिचे लग्न 19 मार्च 2021 रोजी कर्नलगंज येथील शाहनवाजशी झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला कमी हुंड्यावरून टोमणे मारायला आणि त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या वडिलांनी दीड लाख रुपये दिले, मात्र परंतु त्यांनी आणखी पाच लाख रुपये मागितले. मात्र पैसे न देऊ शकल्याने 18 सप्टेंबर रोजी रेश्माच्या सासरच्यांनी तिला जबरदस्तीने जुन्या आणि बंद खोलीत कोंडून ठेवले.
रिझवानाने दिलेल्या माहितीनुसार रेश्माला खोलीत बंद केल्यानंतर सासरच्यांनी एक विषारी साप खोलीत सोडला. त्या सापाने रेश्माच्या पायाला चावा घेतला. त्यामुळे रेश्माला वेदना होऊ लागल्या, मात्र तिच्या सासरच्यांनी दार उघडले नाही, ते सर्वजण बाहेर हसत उभे होते. रेश्माने तिच्या बहिणीला बोलावले आणि त्यानंतर तिला त्या घरातून बाहेर काढण्यात आले, सध्या तिच्यावर हॅलेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
रिझवानाच्या तक्रारीनंतर पोलीसांनी रेश्माचा पती शाहनवाज, सासू, सासरे, मेहुणे आणि मेहुणीसह 7 जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. तपासानंतर आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.