J&K : जम्मू-काश्मिरात स्फोटक सिलिंडर आढळल्याने घबराट; लष्कराने तातडीने संशयास्पद स्फोटक केले निकामी

| Updated on: Jul 15, 2022 | 2:46 AM

लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने स्फोटक सिलिंडर नष्ट केला. यावेळी लष्कराच्या जवानांनी परिसरातील वाहतूक रोखून धरली होती. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

J&K : जम्मू-काश्मिरात स्फोटक सिलिंडर आढळल्याने घबराट; लष्कराने तातडीने संशयास्पद स्फोटक केले निकामी
काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यात गुरुवारी एक स्फोटक सिलिंडर (Explosive cylinder) सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. या स्फोटकाची गुप्त माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि संशयास्पद स्फोटक सिलिंडर उद्ध्वस्त केला. जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. शहराच्या बाहेरील अखनूर सेक्टरमधील मालपूर येथे पहाटे 4.30 वाजता स्थानिक रहिवाशांना परिसरात संशयास्पद (Suspicious) वस्तू असल्याचे दिसले. संबंधित सिलिंडर स्फोटक असल्याच्या संशयातून तातडीने सुरक्षा दलां (Security Force)ना पाचारण करण्यात आले. त्यानुसार लष्कराला माहिती देण्यात आली.

सध्या काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. त्या भाविकांच्या गर्दीला टार्गेट करण्याची दहशतवाद्यांची कट-कारस्थाने याआधी उघड झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संशयास्पद स्फोटक सिलिंडरवर तातडीने कारवाई करण्यात आली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लष्कराच्या जवानांनी स्फोटक नष्ट करून संभाव्य धोका रोखला.

संशयास्पद स्फोटक सिलिंडरबाबतचा एक व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये बॉम्ब निकामी पथक आणि स्निफर डॉग पावसादरम्यान तो संशयास्पद स्फोटक सिलिंडर निकामी करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिलिंडरचा स्फोट घडवल्यानंतरचेही चित्रण आहे. लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने स्फोटक सिलिंडर नष्ट केला. यावेळी लष्कराच्या जवानांनी परिसरातील वाहतूक रोखून धरली होती. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. सध्या या भागात स्फोटकं कशी पोहोचली याचा तपास लष्कर करत आहे.

हे सुद्धा वाचा

लष्कराने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले

यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी स्फोटक निकामी केले होते. चौधरी बाग रोड येथे भारतीय लष्कराने 5 किलो एलपीजी सिलेंडर आणि 5 किलो स्फोटके असलेला आयईडी जप्त केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी मोठी मनुष्यहानी घडवण्याच्या प्रयत्नात होते. सुदैवाने लष्कराच्या जवानांनी सतर्क राहून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला.

दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद

श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात मंगळवारी पोलिस दलावर हल्ल्याची घटना घडली होती. त्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी शहीद झाला, तर अन्य दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेबाबत ट्विट केले होते. अलीकडे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत. (Explosive cylinders found in Akhnoor district of Jammu and Kashmir)