
पुण्यातील धनकवडी परिसरात एका भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलावून तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक केली असून, त्याच्या या कृत्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंत्र देण्याच्या बहाण्याने विनयभंगाचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्योतिष पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करत होता. त्याने एका तरुणीला मंत्र देण्याच्या बहाण्याने एकांतात बोलावले. मात्र, मंत्र देण्याऐवजी त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान राखत तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव अखिलेश लक्ष्मण राजगुरु (वय ४५, रा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष ऑफिस, राजधानी अपार्टमेंट, शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोड, धनकवडी) असे आहे.
नेमकं काय घडलं?
लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणीला तिच्या मैत्रिणीने एक वर्षापूर्वी हा ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाऊन ये, असे सांगितले होते. ही तरुणीने तिच्या मोठ्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै २०२५ रोजी या ज्योतिषाकडे गेल्या होत्या. पत्रिका पाहून त्याने तुमच्या भावाला एक वनस्पती आणि मंत्र द्यायचा आहे, तुम्ही शनिवारी या असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने अखिलेश राजगुरु याचा व्हॉटसअॅपवर मेसेज आला की तुमची वस्तू आली. तुम्ही ऐकटेच या़ त्यावर त्यांनी मी मावस बहिणीबरोबर येते असा मेसेज पाठवला. त्यावर या ज्योतिषाने परत मेसेज केली की, बहिणीला शंकर महाराज मठात पाठवा, तुम्ही ऐकटेच या. त्यावर त्यांनी मी वस्तू घ्यायला नंतर येते असे मेसेज केला.
त्यानंतर १८ जुलै रोजी अखिलेश यांनी व्हॉटसअॅपवर मेसेज केला की, उद्या सकाळी १० वाजता तुमची वस्तू घ्यायला या. त्यानंतर फिर्यादी तरुणी १९ जुलै रोजी कॉलेजवरुन थेट त्याच्या कार्यालयात गेल्या. तेव्हा कार्यालयात कोणी नव्हते. अखिलेश यांनी याचा फायदा उचलत तरुणीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी तेथून पळून आली.
धनकवडीत संतापाची लाट
धनकवडी परिसरातील या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ज्योतिषासारख्या विश्वासाच्या व्यवसायाचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे ज्योतिष आणि तत्सम व्यवसायांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली असून, त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले असल्याची शक्यता तपासली जात आहे.
नागरिकांना सावधानतेचा इशारा
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः तरुणींनी अशा एकांतातील भेटी टाळाव्यात, असेही पोलिसांनी सुचवले आहे.