Fake Medical Certificate Case : बनावट प्रमानपत्र देणाऱ्या डॉक्टर टोळीतील एकाला बेड्या, म्होरके मात्र अद्यापही फरारच

| Updated on: Sep 28, 2022 | 5:47 PM

आत्तापर्यंत जवळपास 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Fake Medical Certificate Case : बनावट प्रमानपत्र देणाऱ्या डॉक्टर टोळीतील एकाला  बेड्या, म्होरके मात्र अद्यापही फरारच
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : पोलीस दलासह (Police Department) आरोग्य क्षेत्रात (Health Department) खळबळ उडवून देणाऱ्या गुन्ह्यातील डॉ. स्वप्नील सैंदाणे याला नाशिक पोलीसांनी (Nashik Police) अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते त्यात न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. स्वप्नील सैंदाणे याला नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या पथकाने नंदुरबार मधील अक्कलकुवा येथून अटक केली होती. याशिवाय त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली आहे. आंतरजिल्हा बदलीकरिता लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र हे बनावट (Fake Certificate) स्वरूपात बनवून देत होते. डॉ. सैंदाणे याने सर्जन पदवी नसतांना एमडी सर्जन असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय अहवालावर शिक्के आणि सही दिली होती.

संपूर्ण राज्यात चर्चिले जात असलेले बनावट प्रमाणपत्र प्रकरण नाशिक पोलीसांनी चांगलेच मनावर घेतले आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी या बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

आत्तापर्यंत जवळपास 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आत्तापर्यंत नाशिक ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमनला अटक करण्यात आली आहे.

याशियाय सातपूर परिसरात असलेल्या प्रभावती रुग्णालयाचे डॉ. स्वप्नील सैंदाणे, जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमचे लिपिक किशोर पगारे, सिडकोतील सहजीवन रुग्णालयाचे डॉ. वीरेंद्र यादव यांचा समावेश आहे.

हे सर्व गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यात डॉ. स्वप्नील सैंदाणे हे पोलीसांच्या हाती लागले असून त्यांचा एक साथीदार देखील पोलीसांच्या हाती लागला आहे.

याशिवाय या प्रकरणातील नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास आणि डॉ. निखिल सैंदाणे यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला होता, मात्र जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यामुळे त्यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार कायम असून नाशिक तालुका पोलीसांनी या प्रकरणातील तपासाला वेग दिला आहे.