
डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका चौकडीला पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक केली आहे. फिर्यादीला फसवून दुर्गम ठिकाणी नेत त्याच्यावर हल्ला करीत त्याची सोन्याची चेन लुबाडण्यात आली होती. तसेच फियार्दीच्या डोळ्याच लाल मिरचीची पावडर टाकण्यात येऊन त्याला दुखापत करण्यात आली होती.
आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व परिसरात फिर्यादीला फसवून दुर्गम ठिकाणी नेऊन त्याच्यावर हल्ला करून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या सात तासांत पकडत मोठी कामगिरी केली आहे. या धक्कादायक घटनेत फिर्यादीच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्याला दुखापत करण्यात आली होती.
२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी आपल्या घरी जात असताना एक महिला आणि तिच्या साथीदार असलेल्या रिक्षाचालकाने त्यांची फसवणूक केली. फिर्यादींना गोरेगाव येथील आरे डेअरीच्या पाठीमागील निर्जन रस्त्यावर नेऊन, आधीच तयार असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना बोलावून या सर्वांनी मिळून फिर्यादीची ५ लाखांची सोन्याची चेन जबरीने खेचली. विरोध करण्याचा प्रयत्न करताच फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हे सर्व आरोपी पळून गेले होते.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील १७ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात दोन संशयित दिसून आले होते. मात्र चेहरे स्पष्ट नसल्याने ओळख पटविणे कठीण होते. तरीही तपासकौशल्य दाखवत पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या ठशांच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
अटक आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली असून त्यात सोन्याची साखळी – किंमत ५,००,००० रुपये, पल्सर मोटारसायकल – किंमत १,००,००० रुपये आणि ऑटो रिक्षा – किंमत ४,५०,००० असा एकूण १०,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींमध्ये विशाल सिद्धार्थ वाघ ( वय – २७ ) नमेश नागेश सुर्वे ( वय – २३) ,जहागीर सल्लाउद्दीन कुरेशी ( वय- २५) आणि शहरीन औरंगजेब कुरेशी ( वय – २४) यांचा समावेश आहे अशी माहिती आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.
विशाल वाघ या आरोपीविरुद्ध पूर्वीचे दरोडा, चोरी, दुखापत अशा ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.