बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड, आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

महापलिकेने या प्रकरणात डोंबिवली रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण ग्रामीणमधील तब्बल 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड, आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Nov 05, 2022 | 10:17 PM

कल्याण : महापालिका अधिकारी आणि पालिकेचे खोटे सही शिक्के वापरत महारेराचे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी एसआयटीने एका महिलेसह पाच जणांना बेड्या ठोकल्या. सर्व अटक आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेली कल्याण न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे अशी या आरोपींची नावे आहेत. बनावट कागपत्र तयार करणाऱ्या टोळीपासून सावध रहा. असं काही आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

वास्तू विशारद संदिप पाटील यांनी उघड केला घोटाळा

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून खोट्या सही शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवानगी असल्याचे भासवून काही बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रकल्पांचे प्रमाणपत्र मिळवले होते. या प्रकरणी माहिती अधिकारात वास्तू विशारद संदीप पाटील यांनी ही बाब उघड केली होती.

65 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल

यानंतर पाटील यांनी महापलिकेकडे चौकशीची मागणी केली होती. महापलिकेने या प्रकरणात डोंबिवली रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण ग्रामीणमधील तब्बल 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तपासाकरीता एसआयटीची नेमणूक

राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर या प्रकरणाच्या तपासाकरीता पोलीस आयुक्तांनी एसआयटी नेमत, एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी सात बिल्डरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार जणांचा अर्ज फेटाळला. तीन जणांना तीन आठवड्याकरीता अंतिम जामीन मंजूर केला होता.

मात्र एसआयटीने 65 पैकी 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया नुकतीच केली होती. त्यानंतर आज एसआयटीने खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांना बेड्या ठोकत कल्याण न्यायालयात हजर केले.

कल्याण न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या एसआयटी टीम ही कागदपत्रे कुठे आणि कशी बनवली? त्यांचे आणखी किती साथीदार आहेत? याचा तपास सुरू करत आहे.