मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणू म्हणाला आणि पैसे घेऊन थेट…

| Updated on: Oct 14, 2023 | 2:26 PM

आरोपीने पीडित महिलेकडून 25 हजार रुपये घेतले आणि तो निघून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही तो परतलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली.

मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणू म्हणाला आणि पैसे घेऊन थेट...
Follow us on

शाहिद पठाण, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 14 ऑक्टोबर 2023 : शहरात सध्या फसवणूकीचे (fraud case) गुन्हे बरेच वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक बरेच त्रासले आहे. निष्पाप नागरिकांना फसवून त्यांना गंडा घालणाऱ्या आणि त्यांच्या मेहनतीची कमाई लुटणाऱ्या भामट्यांना रोखण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करतात. मात्र त्यात दरवेळेस यश मिळतेच असे नाही. अशीच एक फसवणुकीची धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी घटना शहरात घडली आहे.

आजारी असलेल्या मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणून देत तिच्या आईकडून भामट्याने 25 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी कारवाई करत त्या भामट्याला बेड्या ठोकत अटक केली.

बोलता-बोलता काढली ओळख आणि नंतर..

हिवराज महादेव सूर्यवंशी (52) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या रुग्णालयात ही घटना घडली. तेथे एक महिला तिच्या आजारी मुलीला उपचारांसाठी घेऊन आली होती. तिची तब्येत बरी नसल्याने ती माऊली आधीच चिंतेत होती. आरोपीने हे हेरलं आणि त्याने त्या महिलेशी ओळख काढून बोलायला सुरूवात केली. त्या महिलेच्या मुलीला रक्ताची गरज असल्याचे ते समजलं. आपण ते रक्त आणून देऊ शकतो, असं गप्पा मारता मारता त्याने सांगितलं.

त्यासाठी आरोपीने पीडित महिलेकडून 25 हजार रुपये घेतले आणि तो निघून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही तो परतलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार पांढरी येथून पोलिसांनी आरोपी हिवराज याला अटक केली. तसेच त्याच्याकडून 25 हजार रुपये रोख व मोटारसायकल जप्त करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.