फक्त कुमारिका पाठव, मग पहा .. आजारी मुलाला वाचवण्यासाठी आईने चक्क..

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आजारी मुलाला बरे करण्यासाठी एका आईने स्वतःच्याच १३ वर्षीय मुलीचा तांत्रिकाच्या सांगण्यावरून नरबळी दिला. नवरात्रीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. पोलिसांनी आईसह तांत्रिक आणि एका साथीदाराला अटक केली असून, अंधश्रद्धेचा क्रूर चेहरा पुन्हा समोर आला आहे.

फक्त कुमारिका पाठव, मग पहा .. आजारी मुलाला वाचवण्यासाठी आईने चक्क..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 02, 2026 | 12:40 PM

आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! कवितेच्या या एका ओळीतून मुलांसाठी, घरासाठी आई काय असते हे अगदी समर्थपणे दिसतं. आई-मुलांचं नात, प्रेम, मुलांसाठी काहीही करण्याची तिची तयारी याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मातृत्वाला लाज आणणारा एक प्रकार उघडकीस आलं आहे. तिथे एका आईने आपल्या मुलाचा आजार बरा करण्यासाठी, स्वतःच्याच, पोटच्या मुलीला एका तांत्रिकाच्या हवाली केलं. त्यानंतर त्या तांत्रिकाने निरागस मुलीचा बळी दिला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून, पोलिसांनी या प्रकरणात मृत मुलीची आई, एक महिला तांत्रिक आणि आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुसुंभा गावात घडली. तपासात असे उघड झालं की, हा संपूर्ण प्रकार एका आजारी मुलाला बरं करण्यासाठी देण्यात आलेल्या नरबळीच्या विधीचा भाग होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपी रेशमी देवी (35) ही तिच्या लहान मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आजारांमुळे चिंतेत होती. याच दरम्यान गावातील शांती देवी ( वय 55 ) नावाच्या एका मांत्रिकाशी तिचा संपर्क आला. त्या मांत्रिकाने रेशमीला पटवून दिलं की, जर एका कुमारी मुलीचा बळी दिला, तर तुझा मुलगा पूर्णपणे बरा होईल. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी, त्या आईने आपल्या 13 वर्षांच्या मुलीला ठार मारण्याचा कट रचला.

अष्टमीच्या रात्री काळं कृत्य

ही भीषण घटना नवरात्रीच्या आठव्या दिवशी, 24 मार्च रोजी घडली. संपूर्ण गाव रामनवमीच्या मंगल मिरवणुकीच्या उत्सवात मग्न असताना, मांत्रिक शांती देवीच्या घरी एका निष्पाप मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. भीम राम नावाच्या एका व्यक्तीनेही या कृत्यात सहभाग घेतला होता, असं पोलिसांच्या तपासात उघड झालं. एका विधीच्या नावाखाली मुलीवर निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिचा मृतदेह एका बागेत पुरण्यात आला.

तपासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न

सुरुवातीला, आरोपींनी हे प्रकरण बलात्काराचे असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खुद्द त्या आईनेच आपल्या मुलीच्या अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, त्या मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवाल यामुळे हे प्रकरण वेगळं असल्याचं समोर आलं आणि आरोपींचे दावे खोडून काढले. त्यांच्यी कसून चौकशी केल्यानंतरर तिघांनीही आपले गुन्हे कबूल केले, असं हजारीबागचे पोलीस अधीक्षक अंजनी अंजन यांनी सांगितलं.

या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत, राज्य प्रशासन आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे.

Follow Us