VIDEO | ‘सरपंच’ आईचा कानाडोळा, वाढदिवसाला गर्दी जमवत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा डीजेवर ठेका

हिंगोलीतील इंचा गावातील तरुण मंडळी डीजेच्या तालावर थिरकत असतानाचा एका व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ना कुणाच्या तोंडाला मास्क होता, ना कुणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करताना दिसले.

VIDEO | सरपंच आईचा कानाडोळा, वाढदिवसाला गर्दी जमवत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा डीजेवर ठेका
हिंगोलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा डीजेवर ठेका
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 11:03 AM

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंगोली तालुका युवक अध्यक्षानेच चक्क गर्दी जमवून डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं समोर आलं आहे. आपल्या वाढदिवशीच राष्ट्रवादीचा पदाधिकारी भाऊराव ठाकरे याने कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत डान्स केला. विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्रीच गावाच्या सरपंच आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसताना तिसरी लाट येण्याची भीती राज्य सरकारच्या वतीने व्यक्त केली जात आहे. राज्यात नियम अधिक कडक करावेत, असेही आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे. पण नागरिकांना याचे भान असल्याचे दिसत नाही. त्याहून गंभीर म्हणजे लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्यातील इंचा गावात लाडक्या लेकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरपंच बाईंनीच गर्दी जमवली आणि डीजे लावू दिल्याचा दावा केला जात आहे. गावातील तरुण मंडळी डीजेच्या तालावर थिरकत असतानाचा एका व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ना कुणाच्या तोंडाला मास्क होता, ना कुणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करताना दिसले.

हिंगोली तालुक्यातील इंचा गावात शशिकलाबाई ठाकरे सरपंच आहेत. त्यांचा मुलगा भाऊराव ठाकरे याचा वाढदिवस होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हिंगोली तालुका युवक अध्यक्ष आहे. शासन गर्दी करु नका असे, आवाहन करत असताना खुद्द सरपंच बाईंनीच गावात मुलाच्या वाढदिवसाला डीजे लावू दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संचारबंदीचे नियमही मोडले

डीजेच्या तालावर पोरं रात्री उशिरापर्यंत थिरकत होती. विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकारी यांनी हिंगोली जिल्ह्यात रात्री संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. पण लोकप्रातिनिधीच अशाप्रकारे नियमांची पायमल्ली करत असतील, तर सर्वसामान्यांनी काय करावे, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

‘डीजेची वरात, बाराच्या भावात’; नगरमध्ये विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल, डीजे जप्त

साताऱ्यातील 13 कोरोनाबळी गेलेल्या हॉटस्पॉटमध्ये लग्नानंतर डीजे पार्टी, व्हिडीओ पाहून पोलिसांची कारवाई

(Hingoli Incha Village Sarpanch lady allows NCP worker Son for DJ Party on Birthday)