
डॉक्टर आणि नर्स यांना जीव वाचवणारं म्हटलं जातं. देवाचं दुसरं स्वरूप मानलं जातं. पण तेच जीवावर उठले तर ? जर्मनीच्या रुग्णालयातील एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एक नर्स, रुग्णांची काळजी घेण्याचं जिचं काम होतं, तीच त्या रुग्णांच्या मृत्यूचं कारण ठरली. न्यायालयाने त्या नर्सला 10 रुग्णांची हत्या आणि 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेपेचे कठोर शिक्षा ठोठावली.
रात्रीच्या ड्युटीला द्यायची जीवघेणं इंजेक्शन
मिळालेल्या माहितीनुसार, या घटना डिसेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान पश्चिम जर्मनीतील वुअरसेलेन (Wuerselen) शहरातील एका रुग्णालयात घडल्या. या नर्सचे नाव अद्याप उघड झालेले नाही, तिने रात्रीच्या शिफ्टमध्ये वृद्ध रुग्णांना मोठ्या प्रमाणात वेदनाशामक आणि झोपेची औषधे दिली असा दावा कोर्टात सरकारी वकिलांकडून करण्यात आला. ते रुग्ण लवकर झोपावेत आणि तिला रात्रभर मेहनत करावी लागू नये हा तिचा (औषधं देण्यामागचा) हेतू होता. तिने अनेक रुग्णांना मॉर्फीन आणि मिडाजोलम नावाच्या औषधांचे प्रमाणापेक्षा जास्त डोस दिले, असं तपासात उघड झालं. ही औषधं इतकी तीव्र होती की ती प्राणघातक देखील ठरू शकतात.
” जीवन-मरणाची झाली स्वामी “
न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितलं की, त्या रुग्णांना जास्त लक्ष आणि वेळ हवा होता त्यांच्यामुळे नर्स चिडली. आरोपी स्वतःला “जीवन आणि मृत्यूचा स्वामी” मानू लागली. म्हणजेच, कोणी जगावं आणि कोणी जगू नये हे तीच ठरवू लागली, असं ते (वकील) म्हणाले. या नर्सने 2007 साली मध्ये तिचे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले होते. ती या रुग्णालयात 2020 सालापासून काम करत होती.
गुन्हा खूप गंभीर
पोलिसांनी 2024 मध्ये तिला अटक केली. हा खटला जेव्हा न्यायालयात पोहोचला तेव्हा हा गुन्हा “अत्यंत गंभीर” असल्याचे मत न्यायालयाने नोंदवलं. त्या नर्सचे गुन्हे इतके गंभीर आहेत की 15 वर्षांनंतरही तिला सुटकेची संधी देऊ नये असा निर्णय न्यायाधीशांनी दिला.
या नर्सने आणखी काही रुग्णाची देखील हत्या केली का, याचा तपास सध्या तपास यंत्रणा करत आहेत. यासाठी, अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत आणि नवीन बळींची ओळख पटवण्यासाठी त्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. जर आणखी पुरावे सापडले तर नर्सवर नवीन खटला चालवला जाऊ शकतो.