जेवण बनवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, मग कामगाराने आपल्या सहकाऱ्याला थेट…

जेवण बनवण्यावरुन झालेल्या क्षुल्लक कारणातून परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जेवण बनवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, मग कामगाराने आपल्या सहकाऱ्याला थेट...
क्षुल्लक कारणातून कामगाराची हत्या
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 09, 2023 | 9:42 AM

भिवंडी / संजय भोईर : जेवण बनवण्यावरुन झालेल्या वादातून एका कामगाराने सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. दीपक बर्मन असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर पिज्यु बर्मन असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दोघेही पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. कामानिमित्त भिवंडी येथे राहतात. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास निजामपुरा पोलीस करीत आहेत.

दोघेही मोलमजुरीसाठी पश्चिम बंगालमधून आले होते

भिवंडी येथील यंत्रमाग उद्योग नगरीत मोलमजुरीसाठी पश्चिम बंगाल राज्यातून पिज्यु बर्मन आणि दीपक बर्मन हे दोघे कामगार आले होते. दोघेही वंजारपट्टी येथील एका कारखान्यात कामाला होते. दीपक बर्मन याची राहण्याची सोय नसल्याने पिज्युने त्याला आपल्यासोबत ठेवले होते. दोघेही एकाच खोलीत राहत होते.

जेवण बनवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला

बुधवारी रात्री कामावरुन आल्यानंतर पिज्युने दीपकला जेवण बनवण्यास सांगितले. मात्र दीपकने आपल्याला जेवण बनवता येत नाही, त्यामुळे आपण जेवण बनवणार नाही असे सांगितले. यावरुन पिज्यु आणि दीपक यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी पिज्युला राग अनावर झाल्याने त्याने दगडाने ठेचून दीपकची हत्या केली.

आरोपीला निजामपुरा पोलिसांकडून अटक

निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. हत्येनंतर आरोपी तेथून पसार झाला आणि पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.