कौटुंबिक वाद टोकाला गेला, मग रक्ताच्या नात्याचाही विसर पडला !

लहान भाऊ दारु पिऊन घरी आला आणि मोठ्या भावाला शिवीगाळ करु लागला. मोठ्या भावाने याबाबत त्याला जाब विचारला. पण दारुच्या नशेत असणाऱ्या लहान भावाला नात्याचाही विसर पडला.

कौटुंबिक वाद टोकाला गेला, मग रक्ताच्या नात्याचाही विसर पडला !
नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: May 05, 2023 | 4:34 PM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे ही खळबळजनक घटना घडली. सदाशिव निकम असे 55 वर्षीय मयत भावाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात लहान भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हरी निकम असे हत्या करणाऱ्या 50 वर्षीय भावाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे निकम यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिवीगाळ केल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी निकम हा रात्रीच्या सुमारास मद्यपान करून घरी आला आणि मोठा भाऊ मयत सदाशिव निकम यांना शिवीगाळ करू लागला. त्याचा जाब विचारला असता संशयित आरोपी हरी दामू निकम याने आपल्या सख्या भावाला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यात सदाशिव निकम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

आरोपी अटक

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी मयताची मुलगी बायडी कैलास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन अंबड पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.