वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, फ्लाईट लेफ्टनंटला अटक

| Updated on: Sep 27, 2021 | 1:38 PM

कोईम्बतूरच्या रेडफिल्डमधील इंडियन एअर फोर्सच्या महाविद्यालयीन वसतिगृहात राहणाऱ्या 29 वर्षीय महिला अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, फ्लाईट लेफ्टनंटला अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

चेन्नई : तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या रेडफिल्डमधील इंडियन एअर फोर्स कॉलेजमधील फ्लाईट लेफ्टनंटला सहकारी महिला अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या अधिकाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून सध्या तो उडुमालाईपेट कारागृहात आहे. कोईम्बतूर पोलिसांनी पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.

काय आहे प्रकरण?

कोईम्बतूरमधील भारतीय हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयात वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती आणि महिला अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रारही केली होती, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. नंतर तिने कोईम्बतूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेने आयएएफ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवर आपण समाधानी नसल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

कोईम्बतूरच्या रेडफिल्डमधील इंडियन एअर फोर्सच्या महाविद्यालयीन वसतिगृहात राहणाऱ्या 29 वर्षीय महिला अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात महाविद्यालयात तीस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण सुरू केले होते. 10 सप्टेंबर रोजी खेळताना तिला दुखापत झाली होती. त्यामुळे औषध घेऊन ती आपल्या खोलीत झोपायला गेली. मात्र, जेव्हा ती रात्री उठली तेव्हा तिला आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजले.

खटला डिफेन्स कोर्टात चालवण्याची आरोपीची मागणी

पीडितेने कोईम्बतूर पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. त्यांनी गांधीपुरममधील महिला पोलीस स्टेशनला तपास करण्याचे निर्देश दिले. तपासानंतर, छत्तीसगडमधील फ्लाईट लेफ्टनंट अमृतेशला न्यायाधीशांच्या घरी नेण्यात आले, जिथे त्याला शरण जावे लागले. अमृतेशच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, कोईम्बतूर पोलिसांना हवाई दलाच्या जवानांविरोधात तपास करण्याचे अधिकार नाहीत, तसेच हा खटला संरक्षण न्यायालयात (डिफेन्स कोर्ट) चालवला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.

नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार

दुसरीकडे, सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी मे महिन्यात नेव्ही अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये नौदलातील दोघे अधिकारी राहत होते. आरोपीने फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केला. मात्र धमक्यांच्या भीतीने गप्प बसलेल्या विवाहितेने अखेर धीर एकवटून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मुंबईतील कुलाबा परिसरात आरोपी आणि पीडित महिलेचा पती असे दोघे नौदल अधिकारी शेअरिंगवर फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. गेल्या महिन्यात पीडितेचा प्रशिक्षणासाठी केरळला गेला होता. त्यावेळी हेड मसाज करण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार विवाहितेने दिली आहे. बलात्काराची तक्रार दिली तर मी आत्महत्या करुन तुझ्या नवऱ्यालाच यात अडकवेन, अशी धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे घाबरलेली पीडिता गप्प बसली होती. मात्र धीर एकवटून तिने पतीला ही गोष्ट सांगितली आणि प्रकरणाला वाचा फुटली.

नेमकं काय झालं?

29 एप्रिल रोजी आरोपीला प्रमोशन मिळालं होतं. त्यावेळी त्याने पीडितेला दुबईहून आणलेली चॉकलेट्स दिली. त्यानंतर आरोपीने मद्यपान केले. डोकं दुखत असल्यामुळे पीडिता स्वतःच्या बेडरुममध्ये पेन किलर घेऊन झोपली. त्यावेळी आरोपी हेड मसाज देण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीत आला.

आरोपीची पीडितेला धमकी

डोक्याला मसाज करतानाच मद्यधुंद अवस्थेत त्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगणार असल्याचं म्हटलं. तेव्हा आरोपीने गोळी झाडून आत्महत्या करण्याची धमकी दिली. इतकंच नाही, तर पीडितेच्या पतीला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याचाही इशारा दिला. त्यामुळे पीडिता घाबरली आणि तिने नस कापून घेण्याचाही प्रयत्न केला.

अखेर तिने धीर एकवटून घडलेला प्रकार फोनवर नवऱ्याला सांगितला. तिचा पती केरळहून मुंबईला आला. त्यानंतर त्याने नेव्ही पोलिसात तक्रार केली. अखेर कफ परेड पोलिसात गुन्हा दाखल करुन आरोपी नौदल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

नौदल अधिकाऱ्याचा सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, मुंबईतील शेअरिंग फ्लॅटमध्ये अत्याचार

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!