
मध्य प्रदेशातील इंदूर कौटुंबिक न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देत पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पतीने पत्नीवर लग्नाआधी पांढरे डाग (व्हिटिलिगो) लपवल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप लावला होता; पण न्यायालयाने हे सगळे आरोप खोटे ठरवले. उलट, पतीनेच पत्नीला त्रास दिला, वेगळा राहिला आणि दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवले, असं स्पष्ट सांगितले आहे.
हा खटला इंदूरमधील एका नामांकित मोबाईल सर्व्हिस सेंटर चालवणाऱ्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्या डॉक्टर पत्नीचा आहे. जानेवारी 2011 मध्ये दोघांनी भागीरथपुरा येथील आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही ठीक चाललं, पण लवकरच सासरच्या मंडळींकडून पत्नीला छळ सुरू झाला. पत्नीचे वकील कृष्णकुमार कुन्हारे आणि डॉ. रूपाली राठोर यांनी सांगितलं की, सासरचे पांढऱ्या डागामुळे सतत अपमान करायचे, बाथरूम साफ करायला लावायचे आणि दहा लाख रुपये अवैध मागणीही केली होती.
नंतर पत्नी पतीसोबत स्वतंत्र भाड्याच्या घरात राहू लागली. तरीही पतीची वागणूक बदलली नाही. 2017 मध्ये पतीने “व्यापारासाठी बाहेर जाणार” असं सांगून पत्नी आणि मुलाला एकटं सोडले. प्रत्यक्षात तो इंदूरमध्येच दुसऱ्या ठिकाणी राहत होता आणि दुसऱ्या महिलांसोबत फिरत होता. या संबंधांचे फोटो पत्नीने पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले.
हातावरील टॅटू अन् पतीची लपवाछपी
सुनावणीदरम्यान न्यायालयाने पतीला हातावरील दुसऱ्या महिलेच्या नावाचा टॅटू दाखवायला सांगितला. पतीने “हे वैयक्तिक बाब आहे” म्हणत दाखवायला नकार दिला. ही एकच गोष्ट त्याच्या विरोधात गेली. शिवाय, पतीचा दावा आहे की “पत्नीने लग्नाआधी पांढरे डागही लपवले” हे आर्य समाज लग्नाचे फोटो पाहिल्यावर खोटे पाहिल्यावर स्पष्ट झाले. फोटोमध्ये पत्नीच्या हातावर डाग स्पष्ट दिसत होते; म्हणजे तिने कधीच काही लपवलं नव्हतं.
“पत्नीने नव्हे, पतीनेच छळ केला”
पत्नीने सांगितलं की, तिने घटस्फोट द्यायला नकार दिल्यावर पतीने 2020 मध्ये खोट्या कारणांवरून याचिका दाखल केली. सासरच्यांविरुद्ध तर महिला पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल आहे आणि ते सध्या जामिनावर आहेत.
सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून न्यायालयाने स्पष्ट केलं की, पत्नीने पतीचा कोणताही छळ केलेला नाही. उलट पतीनेच पत्नीला सोडलं, त्रास दिला आणि दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवले. “स्वतःच्या चुका लपवून घटस्फोट मागता येणार नाही,” असं ठणकावून सांगत इंदूर कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका पूर्णपणे फेटाळली आणि पत्नीला न्याय दिला.