
दत्ता कनवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने अटक केलेल्या इसिसच्या मोहम्मद जोहेब याच्या चौकशीतून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचा देखील प्लान होता, असं देखील जोहेबने नमूद केलं आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोहेबला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, बरीच धक्कादायक माहिती त्यामधून समोर आली. हल्ल्यासाठी पिस्तुल, स्फोटकं, सिम कार्ड उपलब्ध करून मिळाली, अशी माहितीदेखील जोहेबने दिली.
येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने सहा दिवसांपूर्वी संभाजीनगर येथून एका व्यक्तीला अटक केली होती. त्यासाठी NIA ने ९ ते १० ठिकाणी छापेही मारले होते. त्यानंतर एका व्यक्तीला अटक करून एनआयने त्याचा तपास करत कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी मोहम्मद जोहेब याच्याकडून धक्कादायाक माहिती उघड झाली.
इसिसने संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रातही हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यालय असो किंवा संपूर्ण देशातील भाजप कार्यालयावरती सुद्धा हल्ला करण्याचा इसिसचा प्लान ठरला होता. तसेच देशातील काही मोठ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचादेखील कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली. त्यासाठी मोहम्मद जोहेब याला एक सिम कार्ड देखील पुरवण्यात आलं होतं आणि त्याच माध्यमातून टेलिग्राम लिंकच्या द्वारे त्याच्याशी संवाद साधण्यात येत होता.
एवढंच नव्हे तर त्यांना पिस्तुल, स्फोटकं आणि सिम कार्डदेखील पुरवलं जातं होतं. सातत्याने हे जाळं वाढवून देशभरात दहशत पसरवण्याचा देखील प्लान होता, अशा स्वरूपाची माहिती समोर आली आहे. मोहम्मद जोहेब याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ पसरली असून संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.