सगळं काही चोरीचंच, एक चूक नडली आणि पोलिसांनी इतिहासच काढला; चोरट्यांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

चोरी करत असतांना अचानक पोलिसांच्या ताब्यात चोरटे आल्याने मोठ्या गुन्ह्याची उकल झाली आहे. त्यामध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांना मोठे यश आल्याचे बोलले जात आहे.

सगळं काही चोरीचंच, एक चूक नडली आणि पोलिसांनी इतिहासच काढला; चोरट्यांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 26, 2023 | 7:33 PM

कल्याण : खरंतर चोर चोरी करत असतांना त्याचा त्यामागील उद्देश काय असेल हे सांगता येत नाही. मात्र, चोरी नंतर पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी येत असतात. असाच एक चोरीचा प्रकार उघड करत असतांना गुन्हेगारीची अक्षरशः माळ लागल्याचे कल्याणमध्ये समोर आले आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला दुचाकी चोरी करून त्यानंतर धूम स्टाईलने चाकूचा धाक दाखवत महिलांची गळ्यातील सोनं ओरबडण्याचं काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये चौकशी करत असतांना विविध बाबी उघडकीस आल्या आहेत.

कल्याण कोळसेवाडी परिसरात काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या होत्या. त्यामध्ये महिलांच्या गळ्यातील सोनं ओरबाडून पोबारा होणं आणि महागड्या दुचाकी चोरी करणं असे गुन्हे घडत होते.

त्याच पार्श्वभूमीवर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गस्तीवर असतांना दोन चोरांना अटक केली आहे. खरंतर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुचाकी चोरी बरोबरच सोनसाखळी चोरीची घटनाही समोर आल्यानं पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

यामध्ये कोळसेवाडी पोलिसांनी कारवाईत प्रदीप उर्फ सोनु लालचंद विश्वकर्मा ,वसीम अब्दुल अन्सारी असे या दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना आंबिवली परिसरातून बेड्या ठोकत दीड लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.

या चोरट्यांनी विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे.