घटस्फोट द्यायचा, पळून जायचं..; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची कंगनाची पहिली प्रतिक्रिया

राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात आता कंगना राणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणाविषयी विचार करूनच डोकं दुखू लागल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत त्यांनी पतीची हत्या करणाऱ्या सोनमला मूर्ख असं म्हटलंय.

घटस्फोट द्यायचा, पळून जायचं..; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची कंगनाची पहिली प्रतिक्रिया
कंगना राणौत, राजा आणि सोनम रघुवंशी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 2:55 PM

इंदूरमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या जोडप्याने देशभरात खळबळ माजवली आहे. पती राजा रघुवंशीच्या हत्येनंतर पत्नी सोनमने सोमवारी आत्मसमर्पण केलं. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. वडिलांच्या कारखान्यात काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाच्या प्रेमात असलेल्या सोनमनेच पती राजाला मारल्याचं स्पष्ट झालंय. यासाठी तिने प्रियकरासह इतर दोघांना सुपारी दिली होती. सोनमला राजाशी लग्न करायचं नव्हतं. तिचं प्रेम राज कुशवाहवर होतं. म्हणून तिने हा मोठा गुन्हा घडवून आणला होता. आता या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणाचा विचार करून डोकंच दुखू लागल्याचं कंगनाने म्हटलंय. कंगनाने त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी सोनमला मूर्ख म्हटलं असून समाजातील अशा मूर्ख लोकांपासून जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.

कंगना राणौत यांची पोस्ट-

‘हा किती बिनडोकपणा आहे. स्वत:च्याच पालकांच्या भीतीमुळे एक महिला लग्नाला नकार देऊ शकत नाही, पण ती सुपारी किलर्ससोबत मिळून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग करू शकते. सकाळपासून ही गोष्ट माझ्या डोक्यात आहे, पण मला काहीच समजत नाहीये. उफ्फ.. आता माझं डोकं दुखायला लागलंय. ती घटस्फोटसुद्धा देऊ शकत नव्हती किंवा प्रियकरासोबत पळूनही जाऊ शकत नव्हती. हे सर्व किती क्रूर, भयंकर आणि मूर्खपणाचं आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘मूर्ख लोकांना कधीच हलक्यात घेऊ नये. कोणत्याही समाजासाठी त्यांचाच सर्वांत मोठा धोका असतो. आपण अनेकदा त्यांच्यावर हसतो आणि ते कोणालाच काही करू शकत नाही असा विचार करतो. पण हे खरं नाही. एकवेळ शहाणी माणसं स्वत:च्या भल्यासाठी कदाचित दुसऱ्यांचं नुकसान करतील. पण मूर्ख माणसाला ते काय करतायत हेच कळत नाही. तुमच्या आजूबाजूला असलेल्या मूर्खपणाबद्दल जागरुक, खूप जागरुक राहा.’

सोनमने लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनंतर पती राजाला मारण्याची योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहसोबतच्या चॅट्समधून हे उघड झालं आहे. सोनम लग्नाच्या तीन दिवसांतच राजाला मारण्याची योजना आखल्याबद्दल प्रियकराला चॅटमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नानंतर सोनमला तिचा पती राजा रघुवंशीचं तिच्याजवळ येणं आवडत नव्हतं, हेदेखील त्या चॅट्समधून स्पष्ट झालं आहे. सोनमने राज कुशवाहसोबतच्या चॅटमध्ये लिहिलं होतं की तिचा पती राजा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, जे तिला अजिबात आवडत नाहीये. सध्या सोनमने गाझीपूरमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर मेघालय पोलीस तिला शिलाँगला घेऊन जात आहेत.