सोनमने लग्नाआधीच आईला दिली होती धमकी, तिने काय सांगितलेलं?
सोनम रघुवंशीच्या आईला तिच्या अफेअरबद्दल पूर्ण माहिती होती, पण तरीही त्यांनी ते लपवून ठेवलं, अशी प्रतिक्रिया राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने दिली. जर सोनमच्या वडिलांना याबद्दल काहीच माहीत झालं असतं तर त्यांनी तिच्या प्रियकरला नोकरीवरून काढलं असतं, म्हणून सोनमच्या आईने सर्वकाही लपवलं, असं तो म्हणाला.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता त्याचा भाऊ विपिनची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विपिनने धक्कादायक खुलासे केले आहेत. सोनम रघुवंशीने लग्नापूर्वीच तिच्या आईला धमकी दिली होती की जर हे लग्न झालं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही, असं विपिनने सांगितलं आहे. सोनमच्या आईला तिच्या आणि राज कुशवाहच्या अफेअरची पूर्ण माहिती होती. तरीसुद्धा त्यांनी ते लपवून ठेवलं, असा आरोप राजाच्या भावाने केला. याप्रकरणी सोनमच्या आईचीही चौकशी करावी अशी मागणी विपिनने केली आहे.
याविषयी विपिन म्हणाला, “सोनमच्या वडिलांना तिच्या अफेअरविषयी समजलं असतं तर त्यांनी राज कुशवाहला (सोनमचा बॉयफ्रेंड) नोकरीवरून काढून टाकलं असतं. म्हणूनच तिच्या आईने सर्वकाही लपवून ठेवलं. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच सोनम आणि राजा एका दुसऱ्या लग्नसमारंभाला उपस्थित होण्यासाठी गेले होते. तेव्हा राजाने कुटुंबीयांकडे तक्रार केली होती की सोनम त्याच्याशी बोलत नाहीये आणि एका कोपऱ्यात तिच्या मोबाइलमध्ये व्यस्त आहे. सोनमचं हे वागणं अजिबात आवडलं नसल्याचं राजाने म्हटलं होतं. तेव्हा कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितलं की हे लग्न नवीन आहे, वेळेनुसार सर्वकाही ठीक होईल.”
सोनमच्या कुंडलीतील मंगळ दोषाबद्दलही विपिनने धक्कादायक दावा केला आहे. “सोनमच्या कुंडलीत मंगळ दोष खूप मजबूत होता. त्यामुळे राजाची हत्या केल्याने तिचा मंगळ दोष संपेल असं तिला वाटलं. सोनमने आधीच योजना आखली होती की राजाच्या हत्येनंतर ती राजशी लग्न करेल. जेणेकरून कोणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही”, असंही विपिन पुढे म्हणाला. पोलिसांनी आता विपिनच्या या दाव्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.




सोनमने लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनंतर पती राजाला मारण्याची योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहसोबतच्या चॅट्समधून हे उघड झालं आहे. सोनम लग्नाच्या तीन दिवसांतच राजाला मारण्याची योजना आखल्याबद्दल प्रियकराला चॅटमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नानंतर सोनमला तिचा पती राजा रघुवंशीचं तिच्याजवळ येणं आवडत नव्हतं, हेदेखील त्या चॅट्समधून स्पष्ट झालं आहे. सोनमने राज कुशवाहसोबतच्या चॅटमध्ये लिहिलं होतं की तिचा पती राजा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, जे तिला अजिबात आवडत नाहीये. सध्या सोनमने गाझीपूरमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर मेघालय पोलीस तिला शिलाँगला घेऊन जात आहेत.