Kolhapur Crime : उद्यानात खेळायला गेले ते परतलेच नाहीत, दोघा चिमुकल्यांसोबत नक्की काय घडलं?

शाळेला सुट्टी असल्याने रविवारी दुपारी दोन अल्पवयीन मुलं उद्यानात खेळायला गेली होती. मात्र त्यानंतर मुलं घरी परतलीच नाहीत. मुलांसोबत नक्की काय घडलं याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Kolhapur Crime : उद्यानात खेळायला गेले ते परतलेच नाहीत, दोघा चिमुकल्यांसोबत नक्की काय घडलं?
उद्यानात खेळायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचे अपहरण
| Edited By: | Updated on: Sep 01, 2023 | 3:56 PM

कोल्हापूर / 1 सप्टेंबर 2023 : उद्यानाच खेळायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचं अपहरण झाल्याची घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. ओळखीतल्याच महिलेने मुलांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरमधील कनाननगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला आहे. सांगली,मिरज सह परिसरातील रेल्वे स्टेशन आणि मंदिरांमध्ये पोलिसांकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे. तीन दिवस उलटले तरी मुलांचा अद्याप शोध लागला नाही. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दुपारी उद्यानात खेळाला गेले ते परतलेच नाहीत

रविवारी दुपारी 11 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाची मुलगी महावीर उद्यानात खेळायला गेले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी मुलं घरी परतली नाही. यानंतर घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, कनाननगरात भीक मागणारी महिलाही मुलं गायब झाल्यापासून बेपत्ता झाली. सदर महिला कधी कधी कनाननगरातील मुलांना भीक मागण्यासाठी घेऊन जायची. यामुळे सदर महिलेनेच मुलांचे अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

पोलीस पथकाकडून महिला आणि मुलांचा शोध सुरु

नातेवाईकांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठत मुलांच्या अपहरणाची तक्रार दाखल करत, सदर महिलेवर संशय व्यक्त केला. शाहूपुरी पोलीस मुलांचा शोध घेत आहेत. तसेच सदर महिलेचा शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मिरज येथे तर एक पथक गोव्याला रवाना झाले आहे. एक पथक कोल्हापूर शहरात महिला आणि मुलीचा शोध घेत आहे.