
नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल लागल्यानंतर जल्लोषाने न्हाऊन निघालेल्या कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून पारापारावर निवडणुकीची चर्चा रंगली होती. आमका जिंकला आणि टमका पडला ही चर्चा सुरू असतानाच आता गावकऱ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पहाटे पहाटेच मुंबईला येणाऱ्या बसवर दरोडा पडल्याची वार्ता कानावर पडल्यापासून गावकरी सुन्न झाले आहेत. चाकूचा धाक दाखवून सात आठ जणांनी बस लुटली. तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पोबारा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांच्या तोंडी आता निवडणुकीऐवजी या दरोड्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
ही बस कोल्हापूरहून मुंबईला सायनला जाणार होती. पुढे सायनवरून भायखळ्याला जाणार होती. अशोका कंपनीची ही खासगी आराम बस होती. पण कोल्हापूरच्या किणी गावात काल मध्यरात्री 12 वाजता सात ते आठ अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून मोठी लूट केली. बसचा सिनेस्टाईलपाठलाग करून ही लूट करण्यात आली. या सर्व प्रकाराने सर्वच हादरून गेले आहेत. बस चालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं असून खासगी बस कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे.
आधी तिघे बसले, नंतर…
कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस क्र.MH 09 GJ 7272 ही ही रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. तावडे हॉटेल जवळ तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसले. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील भुताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. पाठीमागून पाच ते सहा अनोळखी लोक सिनेस्टाईलने बसचा पाठलाग करत आले. हे पाच सहाजणही थांबलेल्या बसमध्ये चढले आणि त्यांनी अरेरावीला सुरुवात केली.
थांबला तर मारून टाकू…
या सर्वांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो वजनाची चांदी, प्लॅस्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच एक मोबाईल हँडसेट असा सुमारे असा सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरानी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे बिथरलेल्या बस चालकांनी बस पुढे नेली. त्यानंतर बस चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील 112 क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून पोलीस तपास करत आहेत.