
हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या अनेक घटना, गुन्हे राज्यात घडत असून त्यामुळे सामान्य नागिरक अक्षरश: भीतीच्या सावटाखाली जगत असतात. करवीर नगरी अर्थात कोल्हापूरमध्येही एक भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय. कोल्हापूरच्या हातकणंगले ( Kolhapoor News) मधील भादोले येथे निर्घृण हत्याकांडामुळे कोल्हापूरवासीयांच्या मनात दहशत पसरली आहे. तेथे एका इसमाने आधी त्याच्या बेसावध पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून नृशंसपणे तिचा जीव घेतला. सोमवारी रात्री हा भयानक प्रकार घडला.
रोहिणी पाटील असे मृत महिलेचे तर प्रशांत पाटील असे खून करणाऱ्या, आरोपी पतीचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नीला संपवल्यानंतर तो गावात गेला, आपण खून केल्याचे कबूल करत मुलींवर लक्ष ठेवा असे गावकऱ्यांना सांगून तो तिथून फरार झाला. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. फरार खुनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, हाकतकणंगले येथील भादोले-कोरेगाव रस्त्यावरती भादोलेच्या हद्दीत आरोपी प्रशांत याने त्याच्या पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सोमवारी रात्री ( 29 सप्टेंबर) 8.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर पती प्रशांत फरार झाला. वडगाव पोलिसात रात्री उशीरा या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी कसून शोध घेत रात्री त्याला बेड्या ठोकल्या.
कोयत्याने वार, रक्ताच्या थारोळ्यात पडली पत्नी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत व त्याची पत्नी, मुलींसह भादोले येथे रहायचा. मात्र रोहिणीच्या वडिलांना बरं नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून ते दोघे रोहिणीच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे ये-जा करायचे. सोमवारी संध्याकाळी ते त्यांच्या घरी, भादोली येथे परत येण्यास निघाले. मोटारसायकलवर बसून ते घरच्या दिशेने निघाले. पण साठेआठच्या सुमारास कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ ते पोहोचले. तेव्हा प्रशांतने चटणी घेऊन ती पत्नी रोहिणीच्या डोळ्यात टाकली. ती बेसावध असतानाचा त्याने हातातील कोयत्याने तिच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर सपासप वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेली रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.
मात्र त्यानंतर आरोपी, प्रशांत हा भादोल गावातील त्याच्या घरी गेला, तेथे लोकांसमोर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिल्याचे समजते. एवढंच नव्हे तर आता मी 5-6 महिने येणार नाही, मुलींकडे लक्ष ठेवा असंही त्याने गावकऱ्यांना सांगत तिथून पळ काढला. या हत्याकांडामुळे गावात एकच खळबळ उडाली.
या खुनाची माहिती समजताच वडगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी प्रशांतचा कसून शोध घेण्यास सुरूवात झाली, अखेर रात्री उशीरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. प्रशांतने हा खून नेमका का केला, त्यामागे काय कारण होतं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.