
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्रीच्या सुमारास फायरिंगची घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली होते. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील काही गुंडांनीच हा गोळीबार केल्याचे समोर आले आणि त्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र त्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली , ती म्हणजे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा भारतात नसून त्याने लंडनला पलायन केल्याचे समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली. असे असले तरी पोलिस त्याचा कसुन शोध घेत असून याप्रकरणाचा तपास करतानाच पोलिसांनी मोठी कारवाई करत घायवळ याला मोठा दणका दिला आहे.
पोलिसांनी बँक खाती गोठवली
कोथरुडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी निलेश घायवळचं कनेक्शन समोर आल्यावर पोलिसांनी त्याच्याभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी घायवळच्या गँगमधील काही साथीदारांना बेड्या ठोकल्या होत्या, तसेच त्याचाही तपास सुरू होता. तेव्हाच तो लंडनला पळून गेल्याचे समोर आल्याने खळबळ माजली.
मात्र पोलिसांनी घायवळ याला जबर दणका दिला असून आता पुणे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेवरही टाच आणत, गुंड निलेश घायवळसह त्याच्या कुटुंबियांची 10 बँक खाती गोठवली आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे घायवळ याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेने घायवळ याच्याविरोधात ही कारवाई केल्याचे समजते.
घायवळ याला बनावट पासपोर्ट तयार कोणी करून दिला?
दरम्यान पोलिसांची कारवाई सुरू असतानाच घायवळ हा लंडनला गेल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली. गुंड असलेल्या निलेश घायवळ याला बनावट पासपोर्ट तयार कोणी करून दिला? हा सवाल उपस्थित होतल आहे. घायवळला पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांची कुंडली तपासली जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, घायवळ याने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट मिळवला असावा, असा संशय पोलिसांना आहे. “घायवळ” ऐवजी “गायवळ” असे नाव त्याने पासपोर्टसाठी वापरलं आहे. तो पासपोर्ट बनवण्यासाठी त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे. दरम्यान दुचाकीची बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याभोवतीचा फास हळूहळू आवळण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.